सध्या टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क याचं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्याने शेअर केलेला एक फोटो. हा फोटो ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांच्या संदर्भातला आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सीने कंपनी सोडत असल्याची घोषणा केली होती. ट्विटरच्या नेतृत्वबदलासंदर्भातच एलॉन मस्कने हे ट्वीट केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये एलॉनने पराग अग्रवाल यांचा फोटोशॉप केलेला फोटो असलेलं एक मीम शेअर केलं होतं. यात सोविएत संघाचा हुकुमशाहा जोसेफ स्टॅलिन याच्या चेहऱ्याच्या जागी पराग अग्रवाल यांचा चेहरा तर त्याचा सहाय्यक निकोलाय येजहोवच्या जागी जॅक डॉर्सीचा चेहरा लावलेला आहे. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, स्टॅलिनविरोधात कट रचण्याच्या आरोपावरुन येजहोव यांची हत्या करण्यात आली होती. एलॉनने शेअर केलेला या दोघांचा फोटो येजहोव यांच्या मृत्युच्या १० वर्षे पूर्वीचा आहे. साधारण १९३० सालचा हा फोटो मॉस्कोमध्ये काढलेला आहे.

सोशल मीडियावर एलॉन मस्क याचं ट्वीट व्हायरल होताच लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. एक युजर म्हणतो की एलॉन तू ट्विटर विकत घे. तर एका युजरने म्हटलं आहे की एलॉन मस्क हा पूर्ण पृथ्वीचाच सीईओ आहे. हीच भारताची शक्ती असल्याचंही एका युजरने म्हटलं आहे.