scorecardresearch

युक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली! कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”

मस्क यांचं ट्वीट व्हायरल झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी एका पोस्टमधून दिलं जशाच तसं उत्तर

युक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली! कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”
ट्वीटरवरील एका पोस्टमुळे वाद (प्रातिनिधिक फोटो सौजन्य एपी आणि रॉयटर्सवरुन साभार)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या इलॉन मस्क यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मस्क यांनी मागील आठ महिन्यापासून सुरु असणाऱ्या युक्रेन आणि रशियादरम्यानच्या युद्धाबद्दल भाष्य करताना एक वादग्रस्त विधान केल्याने युक्रेनचे नेते आणि समर्थकांनी मस्क यांना लक्ष्य केलं आहे. त्यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या वादात उडी घेत मस्क यांच्या ट्वीटर पोलला पोलच्या माध्यमातून जशास तसा रिप्लाय दिला आहे.

झालं असं की मस्क यांनी ट्वीटरवरुन युक्रेन आणि रशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भातील एक पोल पोस्ट केला. यामध्ये त्यांनी तीन प्रमुख मुद्दे मांडले. मस्क यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये ज्या प्रांतावरुन वाद सुरु आहे त्या प्रांतामध्ये निवडणूक घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जर तेथील लोकांना रशियाविरोधात मतदान केलं तर रशियाने तिथून काढता पाय घ्यावा असंही मस्क यांनी म्हटलं आहे. मस्क यांनी क्रिमिया हा पूर्वीपासून रशियाचा भाग असल्याचा दावा केला आहे. इतकचं नाही तर क्रिमियाला पाणी पुरवठा करुन युक्रेनने यासंदर्भात तटस्थ राहावं असाही सल्ला दिला. आपले मुद्दे पोलच्या माध्यमातून मांडताना लोकांचं मत मस्क यांनी जाणून घेतलं.

मस्क यांचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही एक पोल पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी थेट मस्क यांचा उल्लेख केला आहे. तुम्हाला कोणते इलॉन मस्क आवडतात? असा प्रश्न झेलेन्स्की यांनी विचारला आहे. याला प्रश्नाला ‘असे जे युक्रेनला पाठिंबा देतात’ की ‘असे जे रशियाला पाठिंबा देतात’ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.

मस्क यांच्या पोलला २३ लाख मतं मिळाली आहेत. तर झेलेन्स्की यांच्या पोलला अवघ्या काही तासांमध्ये १८ लाखांहून अधिक मतं मिळाली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या