scorecardresearch

“मला फुकट दिलेल्या गोष्टीसाठी मी पैसे का देऊ?” ट्विटर ब्लू टिकवरून भडकलेल्या अभिनेत्याला एलॉन मस्कनं डिवचलं; म्हणे, “सेलेब्रिटिंसाठी…!”

विल्यम शॅटनर यांनी हे ट्वीट केल्यानंतर ते अल्पावधीत व्हायरल होऊ लागलं. आत्तापर्यंत जवळपास १ लाख १० हजार युजर्सनी ते लाईक केलं असून ११ हजार ३०० हून अधिक युजर्सनी रीट्वीट केलं आहे.

elon musk twitter blue tick
ट्विटरवर ब्लू टिकवरून प्रसिद्ध विनोदी अभिनेता एलॉन मस्कला भिडला! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

स्पेस एक्सचे प्रमुख आणि काही महिन्यांपूर्वीच ट्विटरचे सर्वेसर्वा बनलेले एलॉन मस्क हे नेहमीच त्यांच्या भूमिकांमुळे आणि ट्वीट्समु्ळे चर्चेत असतात. पण त्यांच्या या हटके भूमिकांना विरोध करणारे प्रसिद्ध विनोदी अभिनेते विल्यम शॅटनर यांच्याशी मस्क यांचा रंगणारा कलगीतुराही नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरत असतो. आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये असाच कलगीतुरा रंगलाय तो ट्विटरच्या ब्लू टिकवरून! काही दिवसांपूर्वीच एलॉन मस्क यांनी ट्विटर युजर्सला मिळणारी ब्लू टिक घेण्यासाठी पैसे आकारले जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावरून विल्यम शॅटनर यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट मस्क यांना टॅग करून खडा सवाल केला!

विल्यम शॅटनर यांचं ट्वीट!

विल्यम शॅटनर यांनी एलॉन मस्क यांना ट्विटरवर टॅग करून ब्लू टिकसाठी पैसे आकारण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “एलॉन मस्क, ट्वीटरला पैसे दिले नाहीत, तर युजर्सच्या प्रोफाईलला असलेली ब्लू टिक काढून घेतली जात आहे. हा काय प्रकार आहे? मी ट्विटरवर गेल्या १५ वर्षांपासून आहे. इथे मी माझा वेळ आणि माझे विचार दिले आहेत. आणि आता तुम्ही मला सांगत आहात की मी अशा एका गोष्टीसाठी पैसे द्यायचे आहेत, जी मला तुम्ही फुकट दिली आहे? हे काय आहे? कोलम्बिया रेकॉर्ड्स की टेप क्लब?” असा प्रश्न विल्यम शॅटनर यांनी उपस्थित केला आहे.

शॅटनर यांचं ट्वीट अल्पावधीत व्हायरल!

रविवारी विल्यम शॅटनर यांनी हे ट्वीट केल्यानंतर ते अल्पावधीत व्हायरल होऊ लागलं. आत्तापर्यंत जवळपास १ लाख १० हजार युजर्सनी ते लाईक केलं असून ११ हजार ३०० हून अधिक युजर्सनी रीट्वीट केलं आहे. यावर नेटिझन्स व्यक्त होऊ लागल्यानंतर एलॉन मस्क यांनी भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विल्यम शॅटनर यांच्या प्रश्नावर खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे.

“हे सगळ्यांना एकसमान वागणूक देण्याचाच एक भाग आहे. सेलेब्रिटींसाठी वेगळ्या प्रकारची वागणूक असायला नको असं मला वाटतं”, असं एलॉन मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

सेलेब्रिटींच्या वागणुकीवर दोन सेलेब्रिटिंमध्ये चर्चा!

अर्थात, एलॉन मस्क यांचं ट्वीटही अल्पावधीत व्हायरल होऊ लागलं आहे. सेलेब्रिटींना वेगळी वागणूक द्यायला हवी की नको? या मूलभूत प्रश्नाभोवती या दोन सेलेब्रिटी मंडळींमध्ये झालेली ही चर्चा सध्या नेटिझन्समध्येही चर्चेचा विषय ठरली आहे!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 13:55 IST

संबंधित बातम्या