Emotioanl viral video: आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण काही दृश्ये अशी असतात, जी थेट मनात खोलवर जाऊन बसतात. अलीकडेच सोशल मीडियावर समोर आलेला एका लहान मुलीचा व्हिडीओ असाच मनाला भिडणारा आहे. जबाबदारी वय पाहत नाही हे खरं; पण एवढी लहान मुलगी दोन ओझी उचलताना दिसली तेव्हा अनेकांनी समाजाच्याच संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हा व्हिडीओ नारीशक्ती म्हणून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एका छोट्या वयाच्या विद्यार्थिनीचा हा व्हिडीओ आहे, जिथे ती आपल्या दैनंदिन आयुष्यात तिच्यावर पडलेल्या मोठ्या जबाबदाऱ्या पेलताना दिसते. पण, त्याबद्दल त्या मुलीच्या चेहऱ्यावर भीती नाही, गोंधळ नाही… फक्त जगण्यासाठीचा संघर्ष दिसतो. व्हिडीओमध्ये छोट्या वयाची मुलगी शाळेच्या गणवेशात दिसते.

पाठीवर शाळेचे दप्तर असतानाच ती स्वतःच्या डोक्यावर एक जड गॅस सिलिंडर घेऊन चालल्याचे दिसते. गर्दीने भरलेल्या रस्त्यावरून ती निवांत चालत जाते. तिच्या चालण्यात कुठेही घाई-गडबड नाही आणि हे दृश्य पाहून असं जाणवतं की, कदाचित हे तिला रोजच करायला लागत असावे. एका हाताने सिलिंडरला आधार देत आणि पूर्ण ताकदीने ते ओझे सांभाळत ती पुढे जाते. जणू तिला या जबाबदाऱ्या पार पाडण्याची सवयच झाली आहे.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. अनेकांनी त्याबद्दल दुःख, राग आणि असहायता व्यक्त केली. काही युजर्स म्हणाले, “गरिबी मुलांचं बालपण हिरावून घेते, हा व्हिडीओ त्याचं उदाहरण आहे.” तर काहींनी समाजालाच प्रश्न विचारले, “जबाबदारी वय पाहत नाही; पण आपण तरी पाहतो का?” काही जणांनी तिच्या धैर्याला सलाम केला. त्यांनी लिहिले, “ही मुलगी त्या लाखो मुलांचा चेहरा आहे, जे कठीण परिस्थितीतही हार मानत नाहीत.“

“अजूनही कित्येक घरांत आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे की, लहान मुलांनादेखील कष्ट करावे लागतात,” असे अनेकांनी लिहिले. जरी हा व्हिडीओ कोणत्या भागातील आहे हे स्पष्ट होत नाही; मात्र त्यामुळे उभे राहिलेले प्रश्न मोठे आहेत. मुलांचे अधिकार, त्यांचे बालपण, त्यांची सुरक्षितता या बाबी फक्त कागदोपत्री राहिल्या आहेत का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.