Emotional Dolphin Video Viral : अथांग समुद्राच्या पोटात फक्त निसर्गसौंदर्यच नाही, तर प्रेम आणि वात्सल्याचे गहिरे बंधही जपले जातात. कधी कधी समुद्रातून समोर येणारी काही दृश्यं थेट माणसाच्या काळजाला हात घालतात. असाच एक हृदयद्रावक व्हिडीओ सध्या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या समुद्रातून समोर आला असून, तो पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावत आहेत. ही गोष्ट माणसांची नाही, तर एका डॉल्फिनच्या अथांग आणि भावूक मातृत्वाची आहे!

काय आहे या व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेल्या ड्रोन (हवाई) फुटेजमध्ये एक मादी डॉल्फिन समुद्राच्या पाण्यात पोहताना दिसत आहे. पण, ती एकटी नाही… तिच्या पाठीवर तिचं लहानसं, निष्प्राण झालेलं बाळ विसावलं आहे. आपलं बाळ आता या जगात नाही, ही कठोर वस्तुस्थिती स्वीकारायला त्या आईचं मन तयारच होत नाही. ते मृत बाळ समुद्राच्या पाण्यात बुडू नये म्हणून ती आई आपल्या संपूर्ण ताकदीनिशी त्याला पाठीवर आणि तोंडावर तोलून धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. ती वारंवार पाण्याच्या पृष्ठभागावर येते, बाळाचा तोल सांभाळत धडपडते आणि पुढे पुढे जाते.

संपूर्ण कळपानं सावरलं ‘त्या’ आईचं दुःख…

या व्हिडीओमधील सर्वांत जास्त काळजाला भिडणारा क्षण म्हणजे ती दुःखी आई या प्रवासात एकटी नव्हती. थोड्याच वेळात डॉल्फिनचा एक मोठा कळप त्या आईच्या आजूबाजूला गोळा होतो. इतर सर्व डॉल्फिन अतिशय शांतपणे आणि संवेदनशीलतेनं तिच्याबरोबर पोहू लागतात- जणू काही ते त्या माऊलीचं दुःख वाटून घेत आहेत आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सागरी जीवशास्त्रज्ञांच्या मते, डॉल्फिन हे अत्यंत बुद्धिमान आणि संवेदनशील प्राणी असतात. माणसांप्रमाणेच आपल्या जवळच्या जिवाला गमावल्यानंतर त्यांच्यातही अत्यंत तीव्र शोकाकुल भावना निर्माण होतात. ‘geographemarineresearch’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या जगभरात प्रचंड व्हायरल होत असून, तो पाहून नेटकरीही कमालीचे भावूक झाले आहेत.