Husband Wife Bond: प्रेम म्हणजे फक्त आनंदाचे क्षण एकत्र जगणे नसते… तर आयुष्यातील सर्वांत कठीण वळणावरही हात न सोडणे असते, असे म्हणतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक भावनिक व्हिडीओ हेच जणू पुन्हा एकदा सिद्ध करीत आहे. जीवघेण्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या पत्नीचे उपचारांमुळे केस गळून गेले, तेव्हा तिचा आत्मविश्वास तुटू नये म्हणून पतीने जे केले, ते पाहून लाखो लोक भावूक झाले आहेत.
ही हृदयस्पर्शी कहाणी नम्रता नितीन गोयल यांची आहे. कर्करोगावरील उपचारांदरम्यान त्यांना केमोथेरपी घ्यावी लागत आहे. या उपचारांमुळे त्यांच्या डोक्यावरील केस झपाट्याने गळू लागले. एका स्त्रीसाठी केस म्हणजे फक्त सौंदर्य नसते, तर तिचा आत्मविश्वास, ओळख आणि भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात. त्यामुळे केस गळण्याचा ते क्षण नम्रतांसाठी अत्यंत वेदनादायक ठरत होते.
मात्र, त्या कठीण काळात त्यांच्या पतीने घेतलेला निर्णय आता लाखो लोकांच्या मनाला भिडत आहे. पत्नीला एकटेपणाची भावना येऊ नये, तिचे दुःख कमी व्हावे आणि तिला “तू एकटी नाहीस” हे जाणवावे म्हणून त्यांनी स्वतःचेही केस काढून टाकले. नम्रता यांनी हा भावनिक क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओसोबत त्यांनी लिहिलेले शब्द अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारे आहेत. त्यांनी म्हटले, “तुम्ही फक्त तुमचं डोकंच मुंडवलं नाही, तर माझं दुःखही स्वतःसोबत वाटून घेतलं.”
व्हिडीओमध्ये त्यांचे पती शांतपणे स्वतःचे केस काढताना दिसतात. त्या क्षणी नम्रतांच्या डोळ्यांत भावना दाटून आलेल्या दिसतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हजारो लोकांनी या नात्याचे कौतुक केले आहे. अनेकांनी “हेच खरं प्रेम”, “साथ असेल तर संकटही छोटं वाटतं” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कर्करोगावरील केमोथेरपी ही प्रक्रिया शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण मानली जाते. उपचारांदरम्यान रुग्णांचे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. शरीर अशक्त होते आणि मनावरही खोल परिणाम होतो. नम्रता यांनी काही दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडीओ शेअर करून या अनुभवाबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या, “दुसऱ्या केमोथेरपीनंतर माझे केस खूप वेगानं गळू लागले. इतके की, माझं डोकं अतिशय संवेदनशील झालं होतं. केस गळताना प्रचंड वेदना होत होत्या. प्रत्येक वेळी केस हातात येताना मनही तुटत होतं.”
त्यानंतर त्यांनी पतीला डोक्यावरील केस पूर्ण काढून टाकण्यास मदत करण्यास सांगितले; मात्र तो क्षण त्यांच्यासाठी किती कठीण होता, हे त्यांनी शब्दांत मांडले. “मला माहीत होतं की, केस जाणार आहेत. डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं; पण तरीही मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. माझे पती ट्रिमरने केस काढत होते, तेव्हाही डोक्यात खूप वेदना होत होत्या. मी रडले नाही… पण आतून पूर्णपणे तुटल्यासारखं वाटत होतं,” असे त्यांनी सांगितले.
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेक जण या जोडप्याच्या प्रेमाचे कौतुक करत आहेत. संकटाच्या काळात जी व्यक्ती आपल्यासोबत खंबीरपणे उभा राहते, तोच खरा साथीदार असतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
आजच्या काळात नात्यांमध्ये स्वार्थ, गैरसमज आणि अंतर वाढत असल्याच्या चर्चा होत असताना, या पतीने दाखवलेली साथ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पत्नीच्या वेदना कमी करण्यासाठी स्वतःचे केस काढण्याचा त्यांचा निर्णय हा केवळ प्रेम नव्हे, तर नात्याप्रती असलेली खरी बांधिलकी आणि माणुसकी दर्शवणारा क्षण ठरला.
संकटाच्या काळात जोडीदाराचा हात घट्ट पकडून उभं राहणं म्हणजेच खरं प्रेम काय असतं, हे या व्हिडीओने अनेकांना पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर लोक त्या पतीचं भरभरून कौतुक करत असून, “प्रत्येक मुलीला असा जोडीदार मिळावा” अशा भावनिक प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार चर्चा सुरू असून, संबंधित दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.
