तुम्ही एखाद्या अंत्यविधीच्या किंवा अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला गेले असाल तर तेथील वातावरण आणि परिस्थितीचा तुम्हाला नक्कीच अंदाज असेल. आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्याने रडणारे लोक, उदास चेहरे आणि शांतता असं वातावरण सामान्यपणे दिसून येतं. याच कारणामुळे अनेकजण अंत्यसंस्काराला जाणं टाळतात. पार्थिव पाहिल्याने भिती वाटते आणि मनात निराशा निर्माण होते असं अनेकजण सांगतात. मात्र इंग्लंडमधील एका महिलेला अंतिमसंस्काराच्या कार्यक्रमांना जाण्याची आवड आहे. त्यामुळेच ती आतापर्यंत १५० अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला जाऊन आलीय.

लंडनमधील इजलिंग्टन परिसरामध्ये राहणारी ५५ वर्षीय जीन ट्रेंड हिल या अभिनेत्री आहेत. त्यांना कला आणि फोटोग्राफीचीही आवड आहे. मात्र त्याहून धक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांना एका विचित्र गोष्टीमध्ये फार रस आहे. याच त्यांच्या विचित्र छंदामुळे त्या कायम चर्चेत असतात. जीन यांना अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला जायला आवडतं. द सन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यात जीन किमान चार अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावतात.

जीन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या १४ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या ५६ वर्षीय वडिलांचा फुफ्फुसांच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर जीन पूर्णपणे खचल्या होत्या. यामधून सावरत असतानाच सहा वर्षांनी म्हणजेच जीन २० वर्षांच्या असताना त्यांना मातृशोक झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना जबर धक्का बसला होता. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला निरोप देण्यासंदर्भातील तयारी आधीपासूनच करुन ठेवायला हवी असं जीन यांना वाटू लागल्याने त्यांनी आपल्या आईच्या मृत्यूनंतरच्या अंत्यसंस्काराची तयारी आधीच करुन ठेवली होती. आई-वडिलांच्या निधनानंतर जीन यांना त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासंदर्भातील तयारीसाठी संपर्क करु लागले. आपल्या ओळखीचे एवढे लोक आपल्याला सोडून जात असल्याचं पाहून त्यांना दु:ख होतं आहे. यामधूनच सावरण्यासाठी त्या अनोळखी व्यक्तींच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ लगाल्या.

जीन या नंतर हळूहळू स्मशानामध्येच आपला अधिक वेळ घालवू लागल्या. त्या दफनभूमीमध्ये होणाऱ्या अंत्यसंस्कारांची चित्रं काढू लागल्या. त्यांनी मागील १० वर्षांमध्ये १५० हून अधिक अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावलीय. मी जेव्हा दफनभूमीमध्ये जाते तेव्हा मला माझे आई-बाबा जवळ असल्यासारखं वाटतं, असं जीन यांनी म्हटलं आहे. आपण धार्मिक प्रथांचं फार पालन करतो आणि मृत्यूनंतरही एक जग असून मृत्यू झालेल्या व्यक्ती दुसऱ्या जगात जातात असा आपला विश्वास असल्याचं त्या सांगतात. आता जीन दफनभूमीच्या देखरेखीचं काम करतात.