Wildlife Park Tiger Attack Man Shocking Video : इंग्लंडमधील प्रसिद्ध यॉर्कशायर वाइल्डलाइफ पार्क (Yorkshire Wildlife Park)मधून एक अत्यंत थरारक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका मानसिक संतुलन बिघडल्याने तरुणाने थेट वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारली. पिंजऱ्यात पडताच एका वाघाने त्या तरुणावर झडप घेतली. या भीषण हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला, त्यानंतर पॅरामेडिक्स आणि डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तो पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा करीत आहे.

काय आहे नेमकी घटना?

प्रत्यक्षदर्शींच्या मते, ही घटना अत्यंत वेगाने घडली. यॉर्कशायर वाइल्डलाइफ पार्क हे पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण केंद्र आहे. येथील अधिवासात ‘अल्ताई’ (Altai) नावाचा नर अमूर वाघ आहे. संबंधित व्यक्तीने अचानक तिथले सुरक्षिततेचे नियम मोडून थेट पिंजऱ्यात उडी मारली. मग वाघानेही क्षणाचाही विलंब न लावता, त्याच्यावर झडप घेतली आणि दोन पंजात पकडले. या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्या घटनेनंतर पार्क प्रशासनाने तत्काळ पावले उचलत संपूर्ण वाइल्डलाइफ परिसर वीकेंडसाठी बंद केला. तसेच, वाघाला कोणती इजा झाली आहे का, याचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तज्ज्ञांच्या मते, वाघ हा नैसर्गिक शिकारी प्राणी असल्यामुळे मानवी हालचाली किंवा अचानक घडलेल्या प्रकारामुळे तो आक्रमक होऊ शकतो.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, वाघ पिंजऱ्यात उडी घेतलेल्या तरुणावर भीषण हल्ला करत आहे. कधी पाठीमागून त्याची मान जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करतोय, कधी पाठीचे लचके तोडताना दिसतोय, या सर्व हल्ल्यातून तरुण स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतोय; पण वाघ मिळेल तसे त्या तरुणाचे लचके तोडताना दिसतोय, हे दृश्य पाहतानाही धडकी भरतेय.

अशा प्रकारची दुर्घटना यापूर्वी भारतामध्येही घडली आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात (Delhi Zoo) काही वर्षांपूर्वी एक तरुण चुकून वाघाच्या पिंजऱ्यात पडला होता, जिथे वाघाच्या हल्ल्यात त्याचा जीव गेला होता. या दुर्दैवी घटनांवरून पुन्हा एकदा प्राणिसंग्रहालयात फिरताना किती काळजी घेणे गरजेचे आहे, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला असून, युजर्सनी प्राणिसंग्रहालयात जाताना नियमांचे पालन करावे आणि स्वतःची पूर्ण काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.