Girl Child Shocking Video Viral : हल्ली आपल्या आजूबाजूला अशा काही क्रूर घटना घडतायत की, त्या पाहून धक्का बसतोय. लोक अगदी क्षुल्लक कारणावरून एकमेकांचा जीव घेताना मागे-पुढे पाहत नाहीत. अशा घटनांवरून माणुसकी कुठेतरी हरवतेय, असे वाटते. सध्या अशाच प्रकारची एक घटना समोर आलीय, ज्यात एका चिमुकलीने बागेतून पेरू चोरल्याने तिला एका निर्दयी व्यक्तीने अशी काय शिक्षा दिली की, ती पाहून कोणाचेही डोके तापेल.

नेमकी घटना काय?

हिमाचल प्रदेशातील उना येथील एका चिमुकलीने जवळच्या एका बागेतून पेरू चोरला. ते पाहून बागमालक संतापला आणि त्याने रागाच्या भरात चिमुकलीला मारहाण करीत एका लोखंडी खांबाला बांधून ठेवले. चिमुकली जोरजोरात ओरडतेय, किंचाळतेय; पण तो निर्दयी मालक काय तिला सोडत नाही. यावेळी चिमुकली व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला काका, मला वाचवा वाचवा, असे म्हणत विनवणी करतेय. त्यावर तो व्हिडीओ बनवणारा माणूस मालकाला जाब विचारतो की, एक पेरू तोडला म्हणून एवढं मारणार का? त्यावर तो मालक काहीच बोलत नाही. मात्र, परिस्थिती चिघळल्यावर त्या मालकाने तिला केवळ सोडलेच नाही, तर आपल्या कृत्याबद्दल माफीही मागितली.

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. यानंतर त्या मालकाने दुसऱ्या व्हिडीओत अखेर जाहीर माफी मागितली.

निखिल सैनी (@iNikhilsaini) नावाच्या एक्स युजरने हा व्हिडीओ पोस्ट करीत लिहिले, “या माणसाला लवकरात लवकर तुरुंगात टाकले पाहिजे. केवळ बागेतून पेरू चोरल्याबद्दल एका लहान मुलीला बांधून मारहाण करणे कितपत योग्य आहे? लोकांना काय झाले आहे? कल्पना करा की, ही मुलगी मोठी झाल्यावर कोणत्या मानसिक आघातातून जाईल.”

व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या युजरने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूंगो यांनाही हा व्हिडीओ टॅग केला आहे. नंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आणि त्या मालकाने स्वतः एक व्हिडीओ बनवून माफी मागितली. एक्सवर जेम्स ऑफ हिमाचल (@GemsHimachal)ने काकांच्या माफीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मुलीला इतक्या क्रूरपणे वागवणाऱ्या बामालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता सोशल मीडियावर जोर धरत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून खूप संताप व्यक्त केलाय. एका युजरने लिहिले, “तो एक कसाई आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.” दुसऱ्याने म्हटले, “या माणसाला माझ्यासमोर आणा, मग मी काय करायचं ते बघतो.” तिसऱ्याने लिहिले, “अरे, त्याने किमान त्याला एक कानाखाली तरी मारायला हवी होती.” चौथ्याने म्हटले, “कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.”