श्रावण सुरु झाला कि सणांची चाहूल लागायला सुरुवात होते. सर्वात आधी नागपंचमी, त्यानंतर नारळी पौर्णिमा – रक्षाबंधन आणि मग येतो आपला गोपाळकाला अर्थात दहीहंडीचा सण. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण. या दिवशीच्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असते, प्रचंड उत्साह आणि अनोखी मजा असते. पण आता गोपाळकाल्याची ही आतुरता आणि ऊर्जा शब्दांत कशी आणि किती मांडायची? त्यापेक्षा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका लहानग्याचा डान्स व्हिडीओ पाहाच. खरंतर गोपालकाळेला अजून २२ दिवस शिल्लक आहेत. पण हा व्हिडीओ पाहिलात तर खात्रीशीर तुम्हाला बसल्याजागीच ही ऊर्जा अनुभवायला मिळेल.

सोशल मीडियावर खरंतर दररोज अनेक व्हिडीओज व्हायरल होत असतात. सध्या असाच या एका अगदी लहान मुलाचा भन्नाट डान्स व्हिडीओ पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दहीहंडीत हमखास वाजणारं सुप्रसिद्ध मराठी गाणं “तुझ्या घरात नाही पाणी…” सुरु आहे आणि हा लहानगा या गाण्यावर गुंग होऊन दिलखुलास नाचत आहे. सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेला आणि पुन्हा पुन्हा पाहत राहावा असा हा एक अत्यंत गोड व्हिडीओ आहे. असा अंदाज आहे कि यावेळी त्याच्या समोर दहीहंडीची तालीम सुरु आहे. ही तालीम बघता बघता त्याने गाण्यावर ताल धरला. ‘उत्सवासाठी फक्त २२ दिवस बाकी’ अशा कॅप्शनसह सध्या हा व्हिडीओ शेअर होतो आहे.

लहान-मोठ्या प्रत्येकाच्या आवडीचा सण

आपल्याकडे दहीहंडीचा सण हा प्रचंड जल्लोषात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लहान-मोठ्या अशा प्रत्येकाला हा सण आवडीचा आहे. या व्हिडिओमध्ये हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंच आहे. दहीहंडीच्या उत्सवासाठी बरेच दिवस आधीपासून दहिहंडी मंडळांची लगबग आणि तयारी सुरु होते. असंख्य दहीहंडी पथकं, हजारो तरुणांची जिद्द आणि धैर्य, आयोजकांच्या स्पर्धा-बक्षिसं, अन्य विविध कलाकार, इतर मनोरंजनाचे प्रकार आणि सर्वसामान्य जनतेची मिळणारी भरघोस दाद ह्यात हा संपूर्ण दिवस मजेत जातो. मोठ्या धैर्याने आणि कुशलतेने थरावर थर रचून उंच बांधलेली हंडी फोडल्यानंतरचा किंवा तिला यशस्वी सलामी दिल्यानंतरचा आनंद आणि जल्लोष हा खरंच शब्दांच्या पलीकडचा आहे. म्हणूनच अनेक जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. हा व्हिडिओमधला चिमुकला देखील त्यांच्यातलाच एक!