policeman kicking female worker fact check : आठवड्यापूर्वी हिसार आणि बहादूरगड येथे कचरा उचलण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची पोलिस आणि प्रशासनाच्या पथकांशी चकमक झाली. या गोंधळादरम्यान काढलेला एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. या फोटोमध्ये एक पोलीस एका महिला सफाई कामगाराला लाथ मारताना दिसत होता. हा फोटो खरा असून, तो त्याच आंदोलनातील असल्याचा दावा करण्यात आला होता.

तपासादरम्यान, ‘लाईटहाऊस जर्नालिझम’ला आढळले की, हा फोटो एआय-जनरेटेड आहे. या दाव्याची सत्यता पडताळणे महत्त्वाचे होते. कारण- खऱ्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या क्रूरतेचे खोटे चित्रण करणारा एआय जनरेटेड फोटो लोकांमध्ये संताप निर्माण करू शकतो. त्यामुळे एखाद्या घटनेचे खरे स्वरूप चुकीच्या पद्धतीने दाखवले जाऊ शकते आणि खरे फोटो किंवा व्हिडीओ यांच्यावरचा लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो.

काय होत आहे व्हायरल?

@heematwaali या एक्स (ट्विटर) युजरने खोट्या दाव्यासह हा व्हायरल फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘“दररोज हुकूमशाहीचा नवा तमाशा! हरियाणातील हिसार येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संपाचा हा २८वा दिवस आहे. कचरा उचलण्याच्या मुद्द्यावर आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. अशा अनेक घटनांमध्ये १०० हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पोस्टमध्ये पुढे संताप व्यक्त करीत विचारले आहे, “हे कायदेशीर कसे असू शकते? या व्यक्तीला तत्काळ अटक का केली जात नाही? या आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी का मिळत नाही? हे Gen Z शी संबंधित नसल्यामुळे का?” ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

इतर युजर्सदेखील असाच दावा करीत हाच फोटो शेअर करीत आहेत.

https://www.facebook.com/share/p/1J4ocr1c9C

तपास

आम्ही या फोटोची रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपासणी केली. मात्र, या फोटोशी संबंधित कोणतीही विश्वसनीय बातमी किंवा वृत्त आम्हाला आढळले नाही.

फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आम्हाला त्यात काही विसंगती आढळल्या. फोटोत दिसणारे चेहरे खूप तीक्ष्ण (sharp) होते. पार्श्वभूमीतील सर्व लोक एकाच दिशेने पाहत होते, ज्यामुळे आम्हाला हा फोटो एआय-डिटेक्टर्सद्वारे तपासावा लागला.

त्यानंतर आम्ही हा फोटो OpenAI च्या कंटेंट व्हेरिफिकेशन टूलद्वारे तपासला, ज्याने पुष्टी केली की, अपलोड केलेला फोटो OpenAI टूल्स वापरून जनरेट केला गेला आहे.

टूलने दिलेल्या निकालानुसार, हा फोटो OpenAI च्या टूल्सचा वापर करून तयार करण्यात आला होता. तपासणीदरम्यान फोटोमध्ये OpenAI कडून तयार झालेला ‘SynthID’ वॉटरमार्क आढळला. त्यामुळे हा फोटो AI च्या मदतीने तयार केलेला असल्याचे स्पष्ट झाले.

fact check

त्यानंतर गूगल कीवर्ड सर्चद्वारे, आम्हाला एक बातमी मिळाली.

https://www.ndtv.com/india-news/haryana-police-arrest-2-for-creating-violent-ai-image-of-cop-11994867

या बातमीत असे म्हटले आहे की, सोशल मीडियावर पोलीस कर्मचारी आणि महिला सफाई कामगाराचा खोटा एआय जनरेटेड फोटो प्रसारित केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

निष्कर्ष

सफाई कामगारांबरोबर झालेल्या चकमकीदरम्यान पोलीस एका महिला सफाई कामगाराला लाथ मारत असल्याचा दावा करणारा व्हायरल फोटो एआय-जनरेटेड आहे