Independence Day Viral Video Fact Check : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय तिरंग्याऐवजी पक्षाचा (भाजपाचा) झेंडा फडकवला. असा दिशाभूल करणारा दावा करीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. पण, तपासादरम्यान लाईटहाऊस जर्नालिझमला असे आढळले की, हा व्हिडीओ १५ ऑगस्टचा नाही. त्यामुळे घटनेची तारीख आणि संदर्भ पडताळून पाहणे महत्त्वाचे आहे. कारण- एखाद्या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यास तो खोट्या गैरसमजाला आणखीन खतपाणी घालू शकतो आणि राष्ट्रीय कार्यक्रमाशी चुकीचा संबंध जोडला जाऊ शकतो.

काय होत आहे व्हायरल?

@R.J.D – राष्ट्रीय जनता दल या फेसबुक पेजने त्यांच्या फेसबुक पेजवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे आणि “स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रीय ध्वज तिरंग्यापेक्षा भाजपाचा झेंडा अधिक महत्त्वाचा ठरवणे, हा तिरंग्याचा मोठा अपमान आहे. हे देशद्रोह नाही, तर काय आहे? स्वातंत्र्यदिनाच्या आधी भाजपाकडून ‘हर घर तिरंगा’ आणि ‘तिरंगा यात्रा’ यांसारखे उपक्रम राबवले जात होते. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच तिरंग्याचा जाणीवपूर्वक अपमान करून स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचा अपमान केला जात आहे” अशी कॅप्शन पोस्टला देण्यात आली आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास

आम्ही हा व्हिडीओ डाऊनलोड करून आणि त्यातून कीफ्रेम्स काढून आमचा तपास सुरू केला.

रिव्हर्स इमेज सर्चदरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ एक्सवरील एका पोस्टचा भाग आहे. ही पोस्ट पश्चिम बंगालचे मंत्री व आमदार अर्जुन सिंह यांनी ६ जुलै रोजी केली होती.

त्याचे कॅप्शन असे होते की, डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त, मी प्रमोद भवन येथे @bkpcitypolice अंतर्गत बॅरकपूर पोलीस ठाण्याने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला उपस्थित राहिलो, ज्यामध्ये विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. व्हायरल व्हिडीओ या पोस्टचाच एक भाग होता. अर्जुन सिंह यांनी त्यांच्या व्हेरिफाईड एक्स (ट्विटर) प्रोफाईलवरही याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, हा व्हिडीओ स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचा नाही. हा व्हिडीओ बॅरकपूर येथील माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा आहे, जे ६ जुलै २०२६ रोजी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पार पडले आहे. असा खोटा संदर्भ पसरवणाऱ्या पक्षांनी व काही व्यक्तींनी तो प्रसारित करण्यापूर्वी सत्याची पडताळणी करायला हवी होती आणि आपली चूक सुधारायला हवी होती. हे अत्यंत लज्जास्पद आणि अत्यंत निंदनीय कृत्य आहे.

निष्कर्ष

स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात भाजपा कार्यकर्त्यांनी भारतीय तिरंग्याऐवजी पक्षाचा झेंडा फडकवलेला नाही. हा व्हायरल व्हिडीओ जुना असून, तो दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केला जात आहे.