Iran War Fact Check : ४ मार्च रोजी श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर एका अमेरिकन पाणबुडीने इराणची युद्धनौका बुडवली, ज्यामध्ये १२ पेक्षा जास्त खलाश्यांचा मृत्यू झाला. श्रीलंकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांकडून ‘आयआरआयएस देना’ (IRIS Dena) ही युद्धनौका भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील बंदरातून इराणला परत जात होती, अशी माहिती देण्यात आली आहे.
हा हल्ला आखाती प्रदेशापासून शेकडो मैल दूर हिंदी महासागरात झाला, जिथे अमेरिकन आणि इस्रायली सैन्य इराणवर हल्ले करत आहेत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तेहरानकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले जात आहेत.
या हल्ल्यानंतर, ‘लाइटहाऊस जर्नलिझम’ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले. या व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला होता की, भारतीय लष्करप्रमुखांनी इराणी नौदलाच्या जहाजाचे अचूक लोकेशन इस्रायलबरोबर शेअर केल्याची कबुली दिली आणि नंतर हल्ला करण्यात आला.
व्हिडीओमध्ये जनरल उपेंद्र द्विवेदी असे म्हणताना दिसत आहेत की, “इराणी जहाजाने आंतरराष्ट्रीय जलसीमा ओलांडली तेव्हा इस्रायलचे धोरणात्मक सहयोगी म्हणून अचूक स्थानाची माहिती देण्याची जबाबदारी आमच्यावर होती. हा आमच्या नव्या धोरणात्मक कराराचा एक भाग आहे.”
पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हायरल व्हिडीओ एआय टूल्सचा वापर करून बदलण्यात (मॅनिपुलेट) आला आहे. भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी इराणी जहाजाचे लोकेशन शेअर केल्याची कोणतीही कबुली दिलेली नाही, हा व्हायरल दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (ट्विटर) युजर @DrKaalika यांनी एका खोट्या दाव्यासह हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करत आहेत…
तपास…
आम्ही प्रथम लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी या विषयावर दिलेल्या बातमीचा किंवा अहवालाचा शोध घेतला. पण, त्याबद्दल कोणताही अधिकृत अहवाल आम्हाला तरी आढळला नाही.
व्हिडीओमधील एका कीफ्रेमच्या रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्ही ‘फर्स्टपोस्ट’च्या (Firstpost) यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओपर्यंत पोहोचलो.
व्हिडीओचे शीर्षक होते: “India’s Army Chief Speaks on Op Sindoor, Pakistan and Future of Warfare | Raisina Dialogue 2026” हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता.
याच संभाषणाची एक क्लिप फर्स्टपोस्टच्या एक्स (ट्विटर) हँडलवरदेखील शेअर करण्यात आली होती…
PIB (पत्र सूचना कार्यालय) ने देखील स्पष्ट केले होते की, हा व्हिडीओ बनावट आहे.
त्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडीओची एक छोटी क्लिप ‘HIVE Moderation’ या AI डिक्टेशन टूलमध्ये अपलोड केली. HIVE Moderation ने शोधून काढले की, व्हिडीओमधील भाषण एआय जनरेटेड आहे.

निष्कर्ष
भारतीय लष्करप्रमुखांनी इराणी जहाजाचे लोकेशन इस्रायलला दिल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून तयार केलेला आहे. हा व्हायरल व्हिडीओ बनावट असून त्यासोबतचा दावा खोटा आहे.
