Europe heatwave Viral Video : ‘लाईटहाऊस जर्नलिझम’ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जाणारा एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये एक ट्रॅफिक सिग्नल वितळताना दिसत होता. हा व्हिडीओ शेअर करताना असा दावा केला जात होता की, युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचल्याने हा सिग्नल वितळला आहे, असे सांगितले जात आहे.

पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, या व्हायरल व्हिडीओत दोन वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ एकत्र करण्यात आले असून, त्यांचा अलीकडील युरोपमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले आहे.

काय होत आहे व्हायरल?

@newsonscroll या इन्स्टाग्राम युजरने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला ३९.९ हजार लाइक्स होते.

इतर युजर्सदेखील याच दाव्यासह हाच व्हिडीओ शेअर करीत होते…

https://www.instagram.com/reels/DaIavrssCyM

तपास

आम्ही गूगलवर कीवर्ड सर्च करून, या तपासाला सुरुवात केली. युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे ट्रॅफिक लाईट्स वितळल्याचे सांगणारे कोणतेही विश्वासार्ह वृत्त आम्हाला आढळले नाही.

त्यानंतर आम्ही तो व्हिडीओ डाऊनलोड केला आणि ‘InVid’ टूलमध्ये अपलोड करून, त्या व्हिडीओचे कीफ्रेम्स (keyframes) वेगळे केले.

व्हिडीओच्या सुरुवातीला दिसणाऱ्या दृश्यांचा Google Reverse Image Search केले असता, हीच दृश्ये http://www.ilbacodaseta.org या वेबसाईटवरील एका लेखात आधीच प्रकाशित झालेली असल्याचे आढळले.

Lugagnano, il semaforo “sciolto” per il caldo estivo che ha fatto il giro d’Europa. Ma è una fake news

त्या मीडिया वेबसाईटने या लेखाला ‘फेक न्यूज’ (खोटी बातमी), असे म्हटले होते. या लेखात त्या घटनेचे स्पष्टीकरण देताना लिहिले होते, “गेल्या काही दिवसांतील कडक उन्हामुळे ट्रॅफिक लाईट वितळली, अशी एक बातमी संपूर्ण इटली आणि अर्ध्या युरोपमध्ये पसरली आहे.”

पण, खरी समस्या अशी आहे की, त्या ट्रॅफिक सिग्नल वितळण्याशी उन्हाचा किंवा उष्णतेचा काहीही संबंध नाही. गेल्या मंगळवारी, २३ जून रोजी रात्रीच्या वेळी लुग्यानो (Lugagnano) येथे नेमक्या त्याच ट्रॅफिक लाईटखाली एका कारला आग लागली होती. या भीषण आगीमुळे स्थानिक पोलिसांना वाहतूक वळवावी लागली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी व सुरक्षा पूर्ववत करण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवावे लागले होते. ही बातमी केवळ ‘बाको’ (Baco)नेच कव्हर केली होती.”

त्याच न्यूज मीडिया संस्थेने यापूर्वी लागलेल्या आगीची बातमी दिली होती…

Lugagnano, auto in fiamme al semaforo: paura in via 26 Aprile

या लेखात म्हटले होते, “आज संध्याकाळी सुमारे ६ वाजून ४५ मिनिटांनी लुग्यानो शहरातील ‘व्हिया २६ अप्रिल’ (Via 26 Aprile) येथील मुख्य ट्रॅफिक सिग्नलजवळ अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, काही क्षणांतच सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले. दाट धूर पसरल्यामुळे आणि रस्ता बंद झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले, तसेच वाहतूकही विस्कळीत झाली. शहरातील सर्वांत गजबजलेल्या चौकांपैकी एका चौकात कारला आग लागली. चित्रांमध्ये पाहिल्याप्रमाणे हे दृश्य धक्कादायक आहे. पण, सुदैवाने संबंधित वाहनाव्यतिरिक्त कोणतीही जीवितहानी किंवा इतर नुकसान झालेले नाही. अधिक गंभीर परिणाम होऊ शकणाऱ्या या परिस्थितीत हा एक महत्त्वाचा दिलासा आहे.

त्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडीओमध्ये शेअर केलेल्या दुसऱ्या दृश्यावर रिव्हर्स इमेज सर्च केले.

आम्हाला आढळले की, हे दृश्य जर्मनीतील आहे. जर्मनीची वृत्तसंस्था असलेल्या ‘डॉईश प्रेस-एजंटूर’ (DPA)चा एक फॅक्ट चेक लेख आम्हाला मिळाला.

https://dpa-factchecking.com/germany/260629-99-897195

या रिपोर्टमध्ये म्हटले होते, “हा ट्रॅफिक सिग्नल बर्लिनमधील ‘फ्रीडरीशशैन-क्रॉईझबर्ग’ (Friedrichshain-Kreuzberg) जिल्ह्यात, स्प्री (Spree) नदीजवळील एका चौकात आहे. पुढे रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आले होते, “या चौकाच्या कोपऱ्यावर एका क्लबची जागा आहे. जून २०२५ मध्ये येथे आग लागली होती. बर्लिनमधील माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या व्हिडीओमध्ये रस्त्यालगतचा बाहेरील भाग आगीच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येते.”

या घटनेत विचारले गेले की, आगीमुळे ट्रॅफिक सिग्नल खराब झाला का?

जर्मन प्रेस एजन्सीने याबद्दल InfraSignal या कंपनीला विचारले, आणि ही कंपनी बर्लिनमधील ट्रॅफिक लाईट्सची जबाबदारी सांभाळते. त्या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की हो, त्या आगीमुळेच ट्रॅफिक सिग्नलचे नुकसान झाले आहे आणि तो खराब झाला आहे.

आम्हाला क्लबला लागलेल्या आगीबाबत ‘Tagesspiegel’च्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओदेखील आढळला.

आम्हाला या क्लबच्या आगीबद्दल सविस्तर वृत्तदेखील मिळाले.

https://www.rbb24.de/panorama/beitrag/2025/06/berlin-friedrichshain-club-renate-garten-feuer-brand.html

या लेखातील एका फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते… “आगीमुळे निकामी झालेली ट्रॅफिक लाईट यंत्रणा गुरुवार दुपारपर्यंत दुरुस्त केली जाईल.”

निष्कर्ष

युरोपमधील उष्णतेच्या लाटेत ट्रॅफिक सिग्नल वितळल्याच्या दाव्यांसह मोठ्या प्रमाणावर शेअर केला जाणारा हा व्हिडीओ प्रत्यक्षात आगीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमधील दृश्यांचा आहे. त्यामुळे हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.