Yogi Adityanath fact check viral video : भारताची राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारच्या स्फोटात १३ लोकांचा मृत्यू आणि २० हून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ असे म्हणताना ऐकू येत आहेत, “जे दिल्लीत झालं ते बिहारमध्येही होऊ शकतं. ‘त्रिशूल’ हा उपक्रम आपण यासाठी सुरू केला नाही की आपले कार्यकर्ते केवळ प्रदर्शन करतील. आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे आणि त्यासाठी ८०० लोकांचे जीव जावे लागले तरी आपण त्याची तयारी ठेवू. तुम्ही आम्हाला फसवलं आहे; जर दुसऱ्या टप्प्यात तुम्ही भाजपाला मत दिलं नाही तर त्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवा.”

पण, हा व्हिडीओ असा दावा करून शेअर केला जात आहे की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नवी दिल्लीतील स्फोटानंतर व्यासपीठावर आले आणि त्यांनी बिहारच्या लोकांना उघडपणे धमकी दिली की, जर तुम्ही दुसऱ्या टप्प्यात भाजपाला मतदान केले नाही, तर त्याचे असे दुष्परिणाम होऊ शकतात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.”

पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) साधनांचा वापर करून एडिट करण्यात आला आहे, जो खोटा आहे.

काय होत आहे व्हायरल?

@InsiderWB या एक्स (ट्विटर) युजरने हा व्हायरल व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच “स्फोटानंतर सुरक्षितता वाढवण्याऐवजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मतांसाठी बिहारच्या लोकांना ब्लॅकमेल करण्यात व्यस्त आहेत”; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

इतर युजर्स देखील असाच दावा करून हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास

तर सगळ्यात आधी आम्ही व्हिडीओचे निरीक्षण करून तपासणी सुरू केली. व्हिडीओमध्ये वापरलेला आवाज कृत्रिम (synthetic) वाटत होता. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सकाळी नागरिकांशी संवाद साधला, तर कारचा स्फोट संध्याकाळी झाला होता आणि बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी झाले होते, त्यामुळे या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत; ज्यामुळे हा व्हिडीओ जुना असू शकतो असे सूचित होते.

त्यानंतर आम्ही व्हिडीओमधून घेतलेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला. तपासामुळे आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सिवान, बिहारमधील जाहीर सभेला संबोधित करत असलेल्या व्हिडीओपर्यंत पोहचलो. व्हायरल व्हिडीओमध्ये ‘द प्रिंट’ (The Print) चे चिन्ह दर्शविणारा स्क्रीनग्रॅबदेखील होता.

२३ मिनिटांच्या या व्हिडीओत, योगी आदित्यनाथ यांनी दिशाभूल करणाऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटल्याप्रमाणे काहीही बोलले नाही.

हा व्हिडीओ एका आठवड्यापूर्वी अपलोड करण्यात आला होता. आम्हाला या कार्यक्रमाचे असे अनेक थेट लाईव्ह व्हिडीओ आढळले.

त्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडीओ डाउनलोड केला आणि त्याला mp3 फाइलमध्ये रूपांतरित करून अनेक एआय डिटेक्टरमधून तपासला.

  • HIVE Moderation ने सूचित केले की, व्हिडीओमध्ये AI-जनरेटेड किंवा डीपफेक कन्टेन्ट असण्याची शक्यता आहे.
  • तर, Resemble AI ने सूचित केले की, जरी आवाज खरा वाटत असला तरी तो नक्कल केलेला (impersonation) असू शकतो.
  • Deepware नावाच्या आणखी एका ॲपने देखील व्हिडीओ ‘संशयास्पद’ असल्याचे सूचित केले.

निष्कर्ष: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारच्या लोकांना धमकी दिली नाही किंवा ‘बिहारमध्येही स्फोट होऊ शकतो’ असेही म्हटले नाही. सिवान, बिहारमधील त्यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ AI साधनांचा वापर करून एडिट केला गेला आणि तो अलीकडचा म्हणून शेअर करण्यात आला, त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे.