Shocking Viral Video from the Street: सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ अनेकदा मनोरंजन करतात. त्यातली काही दृश्यं अशी असतात, जी पाहिल्यानंतर अंगावर अक्षरशः काटा येतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, तो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावर घडणारा हा प्रकार सुरुवातीला खरा गुन्हा असल्याचा भास निर्माण करतो. मात्र, काही क्षणांत जे घडतं, ते पाहून प्रत्येक जण हादरून जातो.

रस्त्याच्या मधोमध थरारक दृश्य…

व्हायरल झालेल्या व्हिडीओची सुरुवातच धक्कादायक आहे. एका निर्मनुष्य रस्त्यावर एक व्यक्ती निश्चल अवस्थेत पडलेली दिसते. दुसरा तरुण त्याचा पाय पकडून त्याला रस्त्यावरून ओढत नेत असल्याचं दिसतं. त्याच्या हातात मोठं लाकूड असल्यानं पाहणाऱ्याला एखादा गंभीर गुन्हा घडल्याचा भास होतो.

हे दृश्य इतकं वास्तवदर्शी वाटतं की, समोरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची भीतीनं गाळण उडावी. याच वेळी एक बाईकस्वार त्या ठिकाणी येतो आणि समोरचं दृश्य पाहून तो अचानक थांबतो.

काही क्षणांतच संपूर्ण चित्र बदलतं

बाईकस्वार थांबलेला दिसताच हातात लाकूड असलेला तरुण वेगानं त्याच्या दिशेनं धाव घेतो. समोरचं दृश्य पाहून आधीच घाबरलेल्या बाईकस्वाराला त्या तरुणाच्या एकंदर पवित्र्यानं, तो आपल्यावर हल्ला करण्यासाठी येत असल्याची शंका येऊन, भीतीनं त्याची घाबरगुंडी उडते. मग तो क्षणाचाही विलंब न करता बाईक तिथेच सोडून पळ काढतो.

त्यानंतर काही सेकंदांतच जमिनीवर निश्चल पडलेला तरुण उठून उभा राहतो. दोघेही मिळून बाईक ताब्यात घेतात आणि घटनास्थळावरून निघून जातात. ही संपूर्ण घटना पाहिल्यावर हा सर्व प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

VIDEO व्हायरल होताच संतापाची लाट

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हजारो नेटकऱ्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अनेकांच्या मते, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा व्ह्युज आणि लाइक्स वाढविण्यासाठी अशा प्रकारचे धोकादायक प्रयोग केले जात आहेत. काहींनी तर अशा कृतीमुळे गुन्हेगारांना नवनवीन पद्धती सुचू शकतात, अशी चिंताही व्यक्त केली आहे.

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अशा प्रकारच्या व्हिडीओंमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तर, दुसऱ्यानं अशा कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नेमकं सत्य काय?

हा प्रकार प्रत्यक्ष चोरीचा प्रयत्न होता की फक्त व्हिडीओ तयार करण्यासाठी केलेला प्रँक होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या व्हिडीओबाबत निश्चित दावा करणं योग्य ठरणार नाही.

मात्र, कोणताही हेतू असो, अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळणारे किंवा भीतीचं वातावरण निर्माण करणारे गैरप्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकतात. हा गैरप्रकार सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असू शकतो; परंतु त्यामुळे अशा कृतींचं समर्थन होऊ शकत नाही, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

येथे पाहा व्हिडीओ

(टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यातील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. हा लेख केवळ व्हायरल होत असलेल्या घटनेची माहिती देण्यासाठी आहे.)