MP Woman Finds 4 False Teeth In Chocolate Received At Childs Birthday : काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका व्यक्तीला आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्याची धक्कादायक घटना ताजी असताना आता मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एका प्रसिद्ध ब्रँडच्या चॉकलेटमध्ये चार बनावट दात सापडल्याची घटना समोर आली आहे. खरगोनमधील एका खासगी शाळेच्या निवृत्त शिक्षिकेला भेट म्हणून मिळालेल्या चॉकलेटमध्ये चार नकली दात आढळून आले आहेत, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॅपर उघडल्यानंतर वृद्ध महिलेने चॉकलेट खाल्ले, तेव्हा तिच्या दातांखाली काही तरी टणक वस्तू आल्याचा भास झाला. चॉकलेटमध्ये ड्रायफ्रूट्स मिसळले की काय असे तिला वाटले, म्हणून तिने पुन्हा चॉकलेट चघळण्याचा प्रयत्न केला. पण, ती टणक गोष्ट चावली गेली नाही, त्यामुळे तिने तोंडातून चॉकलेट बाहेर काढून बघितले असता तिला चॉकलेटमध्ये बनावट दात सापडले.

या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न सुरक्षा आणि औषध विभागाचे पथक चॉकलेटच्या स्थानिक वितरकाकडे पोहोचले आणि त्यांनी चॉकलेटचे नमुने घेऊन ते भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.

मायादेवी गुप्ता नावाच्या महिलेसोबत ही घटना घडली. त्या खरगोनमधील बँक कॉलनीत राहतात आणि सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. त्यांच्या चॉकलेटमधून चार बनावट दातांचा संच निघाला आहे.

मायादेवी आस्थाग्राम नावाच्या ट्रस्टमध्ये मोफत सेवा देतात आणि तिथे मुलांना शिकवतात. तेथील एका मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हे चॉकलेट मिळाले होते. चार-पाच दिवसांनी हे चॉकलेट खात असताना त्यांना तोंडात काहीतरी अडकल्यासारखे वाटले. अखेर तोंडातून चॉकलेट बाहेर काढून बघितले असता त्यात हा बनावट दातांचा संच होता.

सध्या शिक्षिकेने चॉकलेटच्या आत आढळलेले दात सुरक्षितपणे ठेवले आहेत. यावर खते आणि औषध विभागाचे अधिकारी एच. एल. अवसिया म्हणाले की, या प्रकरणाची माहिती मिळाली आहे, एक पथक पाठवून तपास केला जाईल.

असेच आणखी एक प्रकरण गेल्या महिन्यात उघडकीस आले होते. एका महिलेने इन्स्टाग्रामवर ‘Hershey चॉकलेट सिरपमध्ये मृत उंदीर सापडल्याचा आरोप करत व्हिडीओ शेअर केला होता. इन्स्टाग्राम युजर्सच्या म्हणण्यानुसार, ते सिरप तीन लोकांनी खाल्ल्याने, त्यापैकी एक मुलगी बेशुद्ध पडल्याचा दावा करण्यात आला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake teeth were found in chocolate in chocolate in khargone the teacher got scared on seeing it the food safety department took a sample sjr