Viral Video : सध्याच्या काळात दररोज अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या व्हायरल व्हिडीओवरून अनेक वेगवेगळे विषय चर्चेत येतात. कधी-कधी हे व्हिडीओ एखाद्या मजेशीर घटनेचे असतात, तर कधी-कधी एखाद्या धक्कादायक घटनेचे असतात. आता अशाच प्रकारच्या एका धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कर्नाटकच्या बंगळूरुमध्ये एका वद्ध व्यक्तीला गोणीमध्ये टाकून कुरिअर (पार्सल) करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

नेमकं घटना काय घडली?

एक महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी एका वृद्ध व्यक्तीला पोत्यात भरून कुरिअर म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ही महिला आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य मंगळवारी कुरिअर सेवा केंद्रावर एक भलं मोठं पार्सल घेऊन पोहोचले. यावेळी पार्सलमध्ये एवढं मोठं काय आहे? असं तेथील कर्मचाऱ्यांनी विचारलं असता कुटुंबाला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्या कर्मचाऱ्यांनी पार्सल उघडण्यास सांगितलं.

तेव्हा पार्सल उघडलं असता त्या गोणीमधून एक वृद्ध व्यक्ती बाहेर आली आणि तेथील कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. यावेळी तो व्यक्ती अस्वस्थ झाला होता. कारण त्याला श्वास घेताना त्रास झाला असावा. ही घटना बंगळूरु शहरातील विनायक सर्कलमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर कुरिअर केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं. पण तोपर्यंत संबंधित कुटुंब घाईघाईने तेथून निघून गेलं. त्यानंतर पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांनी त्यांचा शोध घेत चौकशी केली असता संबंधित कुटुंबाने मोठा खुलासा केला.

संबंधित कुटुंबाने असा दावा केला की ते बंगळूरु शहरातील बसच्या तिकिटांच्या वाढत्या दरांचा निषेध करत एक संदेश देण्यासाठी एक रिल (व्हिडीओ) बनवत होते. या माध्यमातून सोशल मीडियावर लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा उद्देश होता असा दावा आता या कुटुंबाने केला आहे. मात्र, या घटनेत पोलिसांनी कुटुंबाचं समुपदेशन केल्यानंतर त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितल्याचं सांगितलं जातं.

दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार, या संपूर्ण घटनेमध्ये त्या कुटुंबातील एक महिला, तिचा पती, तिची सासू आणि तिचा दीर याचा समावेश होता. तसेच गोणीत असलेला वृद्ध व्यक्ती हा त्या महिलेचे वडील होते असं वृत्तात म्हटलं आहे.