आजकाल मॅगी हा बहुतेकांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा पदार्थच बनला आहे. २ मिनिटात तयार होणारी ही मॅगी घाईच्या वेळी अनेकांसाठी पोट भरण्याचं उत्तम साधन आहे. नोकरी करणारे किंवा रात्री उशिरापर्यंत जागणारे लोक भूक लागताच अर्ध्या रात्रीही मॅगी बनवून खातात. पण गेल्या काही दिवसांत मॅगीवर वेगवेगळे प्रयोग करत विचित्र पदार्थ बनवतानाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये पाण्याऐवजी फॅंटामध्ये मॅगी शिजवली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचं डोकं फिरलंय. आता ही फॅंटा मॅगी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलीय.

सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून ओरियोची भजीपासून ते फॅंटा ऑम्लेटपर्यंत अशा विचित्र पदार्थांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आता या विचित्र पदार्थांच्या यादीत फॅंटा मॅगीने एन्ट्री केलीय. हा व्हिडीओ गाजियाबादमधला असून अमर सिरोही या फूड व्लॉगरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवर विक्रेता फॅंटामध्ये बनवलेली मॅगी विकतो आहे. या विचित्र मॅगीची चव चाखण्यासाठी फूड व्लॉगर अमर सिरोही याने या स्टॉलला भेट दिली. त्यावेळी त्याने हा व्हिडीओ त्याच्या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सुरूवातीला विक्रेत्याने कढईत तूप टाकून त्यात कांदे, हिरव्या मिरच्या, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून फोडणी दिली. मग त्याने पॅनमध्ये ‘फँटा’ची पूर्ण बाटली ओतली. त्यानंतर मसाला, हळद, धणे पावडर आणि मीठ घालून उकळत्या फँटामध्ये मॅगी मिसळली. त्यात लिंबाचा रस आणि चाट मसाला टाकला. सुरुवातीला फूड व्लॉगर अमर सिरोही या विचित्र मॅगी डिशबद्दल थोडा साशंक होता. मात्र, त्याची प्रतिक्रिया तुम्ही विचार करता तशी नव्हती. त्याला फंटा मॅगी खूप आवडली. अमर सिरोही व्हिडीओमध्ये म्हणाला, “मला आश्चर्य वाटतंय की इतकी चांगली चव कशी आली.”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चोरटा सायकल चोरण्यासाठी घरात घुसला…पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही !

आणखी वाचा : VIRAL VIDEO : रस्त्यावर अचानक सुरू झाला डॉलरचा पाऊस! नोटा जमा करण्यासाठी लोकांची गर्दी

या फॅंटा मॅगीची किंमत ३० रुपये आहे आणि शीतपेयांसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते. विक्रेत्याने सांगितले की, तो गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हा फॅंटा मॅगी विकत आहे. फॅंटा मॅगीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोकांना हा पदार्थ आवडला आहे, तर काही लोक याला आपत्ती म्हणत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरने लिहिले, ‘जगाचा अंत जवळ आला आहे,’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘मॅगीवरील अत्याचार थांबवा’, तर तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘बस करा आता, नाही पहायची तुझी फॅंटा मॅगी’. हा व्हिडीओ आतापर्यंत ४७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर १ लाखांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे.