Farmer Influencers Clash Viral Video : शेतकऱ्यांसाठी एक सर्वांत त्रासदायक समस्या म्हणजे प्राणी, पक्ष्यांकडून होणारी पिकांची नासाडी. प्राणी, पक्ष्यांमुळे पिकांचं होणारं नुकसान हा पीक उत्पादनातला मोठा अडथळा आहे. तसेच त्यांना रोखणं हेदेखील तितकंच जिकिरीचं काम आहे.शेतकऱ्यांसमोरची ही समस्या संपत नाही तोवर आता एक भलतीच समस्या समोर आली आहे. जी रोखणं आता शेतकऱ्यांच्याही हाताबाहेर जात आहे. सध्या सोशल मीडियावर एका सूर्यफुलाच्या शेतीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात एका शेतकऱ्याला कंटेन्ट क्रिएटर्सनी मनस्ताप दिला आहे.
कंटेन्ट क्रिएटर्सनी कंटेटची भूक भागवण्यासाठी चक्क सूर्यफुलाच्या शेतात घुसखोरी केलीय. शेतकऱ्याची मेहनत आणि अपेक्षांचं फळ असलेलं शेत आता कंटेन्ट क्रिएटर्ससाठी एस्थेटिक बॅकग्राऊंड बनलं आहे. या व्हिडीओतही एका सूर्यफुलाच्या शेतात कंटेन्ट क्रिएटर्सनी अक्षरश: धुडगूस घातलाय, जे पाहून शेतकऱ्याचा राग अनावर होतोय. कोणत्याही परवानगीशिवाय शेतीत घुसून, पिकांचे नुकसान करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेची शेतकऱ्याने कीव केलीय.
फोटोंसाठी अक्षरश: जनावरांप्रमाणे धुडगूस
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नजर जाईल तिथे मोठ्या सूर्यफुलांची शेती दिसते आहे. या शेतात एकाच वेळी शेकडो कंटेन्ट क्रिएटर्स आणि लोक व्हिडीओ, फोटोंसाठी अक्षरश: जनावरांप्रमाणे धुडगूस घालतायत. यावेळी शेतीचा मालक ओरडून रील बनवणाऱ्यांना हाकलून लावताना दिसतोय. शेतात शिरणाऱ्या जनावरांप्रमाणेच तो त्यांना हाकलून लावतो.
काहींना हे हास्यास्रपद वाटू शकते; पण त्यामागील सत्य गंभीर आहे. पूर्वी शेतकरी आपल्या पिकांचे जनावरांपासून संरक्षण करायचे; पण आता त्यांना माणसांपासूनही पिकांचे संरक्षण करावे लागतेय. त्यामुळेच हा व्हिडीओ लोकांना हसवतोय आणि विचार करायलाही लावतोय.
ही घटना एकाच व्हिडीओपुरती मर्यादित वाटू शकते; पण प्रत्यक्षात ती एका मोठ्या समस्येचा भाग आहे. आजकाल लोक सुंदर ठिकाणांचा आनंद घेण्यासाठी परवानगीशिवाय कोणाच्याही शेतात शिरतात आणि पिकांचे नुकसान करतात. शेतकऱ्यांसाठी हे केवळ पीकच नाही, तर ते त्यांच्या उत्पन्न आणि कष्टाचा स्रोत आहे.
त्यामुळे सोशल मीडियावरही युजर्सकडून या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. एका युजरने लिहिले, “ही चेष्टा नाही. ही फुले वाढवण्यासाठी शेतकऱ्याने किती मेहनत घेतली आहे हे फक्त त्यालाच माहीत आहे.” दुसऱ्याने सुचवले की, परवानगीशिवाय शेतात प्रवेश करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी फोटोशूटसाठी शुल्क आकारले जावे. अनेकांनी असेही निदर्शनास आणले की, काही इन्फ्लुएन्सर्स लाइक्स आणि व्ह्युजसाठी मर्यादा ओलांडतात.
