प्रत्येकाला आयुष्यात आनंदाचे क्षण हवे असतात. पण द्वेष, मत्सर आणि एकमेकांचा अपमान करण्याच्या शर्यतीत अनेकजण आनंदाचा खरा अर्थच विसरत चालले आहेत. आज अनेकांकडे महागड्या गाड्या, राहण्यासाठी आलिशान घर असूनही आनंदात नाहीत. पण, फाटक्या झोपडीत राहूनही काही जण आनंदाचे क्षण जगतात. अशावेळी लहानपणीचा तो एक काळ आठवतो, ज्यावेळी एक चॉकलेट मिळाल्यानंतरही आपण आनंदाने उड्या मारायचो. पण, आता महागड्या वस्तू आणि सुखाच्या मोहापाई आपण आयुष्याचा खरा आनंद विसरतोय. पण, छोट्या छोट्या गोष्टींतूनही जगण्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर हा सुंदर व्हिडीओ एकदा पहाच. या व्हिडीओमध्ये एक वडील सेकंड हँड सायकल खरेदी करून घरी आणतात, जी पाहिल्यानंतर चिमुकल्याचा चेहरा अगदी आनंदाने फुलतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून युजर्सचेही डोळे पाणावले आहेत. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ही फक्त सेकंड हँड सायकल आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा, हे भाव असे आहेत की जणू काही नवीन मर्सिडीज बेंझ विकत घेतली आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज, हजारो लाईक्स आणि अनेक रिट्विट्स मिळाले आहेत. याशिवाय शेकडो युजर्सनी व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक वडील सेकंड हँड सायकल घरी घेऊन येत तिची पूजा करत असतात. अगदी सायकलला हार वैगरे घालत ही पूजा सुरू असते. यावेळी सायकलच्या शेजारी उभा असलेला एक चिमुकला आनंदाने उड्या मारताना दिसतोय. यानंतर वडिलांना पाहून तोही सायकलसमोर हात जोडून नमस्कार करतो. ही सायकल जुनी असली तरी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून एक गोष्ट स्पष्ट होते की, कष्टाने विकत घेतलेली छोटीशी वस्तूही मनाला वेगळाच आनंद देऊन जाते. https://twitter.com/AwanishSharan/status/1527843138210975746?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1527843138210975746%7Ctwgr%5E53023c60a76f8c0312b3af170aae83eb13a7d9d9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fviral%2Flife-hacks%2Ffather-and-son-reactions-win-internet-after-buying-second-hand-bicycle-ias-shared-emotional-video%2Farticleshow%2F91742734.cms हा छोटासा व्हिडीओ पाहून लाखो लोक भावूक झाले आहेत. काही युजर्सनी लिहिले की, कदाचित संपूर्ण जगाच्या तिजोरीतूनही असा आनंद विकत घेता येणार नाही. तर काहींनी आयएएस अधिकाऱ्याला म्हटले की, हा व्हिडीओ शेअर करण्याऐवजी तुम्ही त्याला नवीन सायकल विकत घेऊन देऊ शकता. यावर आणखी एका युजरने लिहिले की, आनंदाला मोल नसते सर, आणि हो, बहुतेक लोक म्हणाले की हाच खरा आनंद आहे, जो आपण गमावला आहे.