Auto Driver Father Makes Magical Sunroof for Son Video : बापाचं प्रेम शब्दांत मांडता येत नाही, ते अनुभवावं लागतं. वडिलांचं प्रेम हे कोणत्याही श्रीमंतीच्या तराजूत मोजता येऊ शकत नाही, याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांच्या मनात घर करून राहिलाय. त्यात एका रिक्षाचालक वडिलांनी सुख हे पैशात नसून, मुलांच्या आनंदात असतं हे सिद्ध करून दाखवलं आहे. मुलांची एक छोटीशी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे काही केलं, ते पाहून तुमचंही मन भरून येईल. वडिलांच्या या कल्पकतेचा आणि आपल्या मुलाप्रति असलेल्या अफाट प्रेमाचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. ‘बाप शेवटी बापच असतो’ अशा शब्दांत नेटकरी या रिक्षाचालक वडिलांचं कौतुक करतायत.
वडिलांनी चक्क रिक्षातच केला एक भन्नाट जुगाड
एका रिक्षाचालक वडिलांनी आपल्या मुलाची हौस पूर्ण करण्यासाठी जे केलं, ते पाहून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल. श्रीमंत लोक सनरूफसाठी आपल्या महागड्या कार्सवर लाखो रुपये खर्च करतात. पण, या व्हिडीओत आपल्या मुलाला आलिशान कारमधील ‘सनरूफ’चा आनंद देता यावा, यासाठी या वडिलांनी चक्क रिक्षातच एक भन्नाट जुगाड केला आहे. त्यांनी आपल्या रिक्षाच्या वरील रेक्झिन कापून एक सनरूफ तयार केला आहे, यावेळी त्या सनरूफमध्ये उभ्या असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसतो.
चेहऱ्यावरील हास्य महागड्या गाडीच्या सनरूफपेक्षाही अधिक मौल्यवान
व्हायरल व्हिडीओची सुरुवात रस्त्यावरून वेगानं धावणाऱ्या एका ऑटोरिक्षानं होते; पण रिक्षाच्या छतावर एक अनोखी गोष्ट पाहायला मिळते. तुम्हाला तिथून डोकावणारी दोन हसरी मुलं दिसतात. वडिलांनी ऑटोरिक्षाच्या छतावरील रेक्झिन कापून एक खिडकी तयार केली आहे, ज्यातून ती दोन मुलं बाहेर डोकावून थंड वाऱ्याचा आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य एखाद्या महागड्या गाडीच्या सनरूफपेक्षाही अधिक मौल्यवान वाटतं.
जगासाठी कदाचित हे केवळ एक दृश्य असेल; पण मुलांसाठी ते त्यांच्या सुपरहीरो वडिलांचं प्रेम आहे. व्हिडीओ व्हायरल होताच, त्यावर कमेंट्सचा पूर आला आहे. नेटकरी त्या रिक्षाचालक वडिलांच्या कल्पकतेला आणि उत्साहाला सलाम करीत आहेत.
tv1indialive नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर एकानं कमेंट केली, “खरे श्रीमंत पैशानं श्रीमंत नसतात, ते मनानं श्रीमंत असतात.” दुसऱ्यानं म्हटलं, “प्रत्येक सुपरहीरोकडे कार नसते; काहींकडे ऑटोरिक्षा असते.” आणखी एका युजरनं लिहिलं, “ते नशीबवान आहेत. कारण- त्यांना वडील आहेत.” दुसऱ्यानं म्हटलं, “हे वडीलच खरे श्रीमंत आहेत.”
