Indian Railway House video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण काही व्हिडीओ असे असतात, जे पाहणाऱ्यांच्या मनाला थेट स्पर्श करून जातात. हे व्हिडीओ केवळ वेगळेपणामुळे नाही, तर त्यामागील भावना, कष्ट आणि अभिमानामुळे लोकांच्या लक्षात राहतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
पहिल्या नजरेत साधा वाटणारा हा व्हिडीओ पाहताच लोक थांबतात, पुन्हा पुन्हा पाहत राहतात आणि त्यामागची गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागातील एक साधे घर अचानक चर्चेचा विषय बनला आहे. कारण- ते घर फक्त घर न राहता एका भावनेचे प्रतीक बनते. या व्हिडीओमधून पालकांचे स्वप्न, त्यांचा अभिमान आणि मुलाच्या यशाचा आनंद अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडलेला दिसतो. त्यामुळेच हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ राजस्थानमधील एका छोट्या गावातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे घर सुरुवातीला साधे वाटते; पण जवळून पाहिल्यावर ते थेट इंडियन रेल्वेच्या कोचसारखे दिसते. चमकदार निळ्या, पांढऱ्या व पिवळ्या रंगात रंगवलेले हे घर अगदी रेल्वे डब्याप्रमाणे वाटते. घराच्या भिंतींवर ट्रेनसारख्या आयताकृती खिडक्या, दरवाजाजवळील पिवळ्या पट्ट्या, खाली चाकांसारखी चित्रे आणि वर मोठ्या अक्षरांत लिहिलेला क्रमांक सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
पाहा व्हिडीओ
घराच्या मागील बाजूस रेल्वेमध्ये दिसणारे इमर्जन्सी चिन्हांसारखे लाल गोल क्रॉसही काढलेले आहेत. ही कल्पकता कोणत्याही डिझायनरची नसून, एका साध्यासुध्या वडिलांची आहे. त्यांच्या मुलाला भारतीय रेल्वेमध्ये नोकरी लागल्याच्या आनंदात त्यांनी सगळे घरच रेल्वे कोचसारखे रंगवून टाकले. हा पेंटिंगचा निर्णय त्यांच्या मुलासाठी एक सरप्राइज होते आणि तो त्यांच्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण वाटतोय. व्हिडीओमध्ये वडील किंवा मुलगा दिसत नसला तरी संपूर्ण घराची रंगरंगोटीसह सजावट त्यांच्या भावनांची गोष्ट सांगत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, अवघ्या काही दिवसांत त्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या वडिलांच्या प्रेमाचे आणि विचारांचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, “वडील आपलं प्रेम अशाच पद्धतीनं दाखवतात.” तर दुसऱ्याने म्हटले, “हे घर नाही, ही एका वडिलांच्या स्वप्नांची रेल्वे आहे.” काही जणांनी गमतीने विचारले की, आता संपूर्ण गाव रेल्वे स्टेशनसारखे वाटत असेल का? तर काहींनी हे दृश्य पाहून डोळे भरून आल्याचे सांगितले. हा व्हिडीओ केवळ रंगरंगोटीमुळे नाही, तर त्यामागील भावना आणि संघर्षामुळे लोकांच्या मनात घर करून बसला आहे.

