सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. कुठे महागडे कॅमेरे, कुठे परफेक्ट अँगल, तर कुठे लाखो रुपये खर्च करून तयार केलेली कंटेंट स्टोरी. पण, या सगळ्या महागड्या दुनियेत कधी कधी एखादा साधा, अगदी मनाला भिडणारा क्षण लोकांच्या हृदयात घर करून जातो. असा क्षण कोणत्याही ट्रेंडसाठी नसतो, ना प्रसिद्धीसाठी; तो असतो फक्त भावनांसाठी, नात्यांमधल्या प्रेमासाठी.

अशाच एका साध्या पण अत्यंत भावूक व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ पाहताना डोळे पाणावतात आणि मन नकळत म्हणतं आजही भावना जिवंत आहेत. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, तरी माणसाच्या हृदयातलं प्रेम अजूनही मोठं आहे, हेच या व्हिडीओतून सांगून जातं.

ही घटना एका शाळेतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातली आहे. शाळेत देशभक्तीची गाणी, रंगीबेरंगी कपडे घातलेली मुलं आणि उत्साहाचं वातावरण होतं. त्याच कार्यक्रमात एका छोट्या मुलीचा परफॉर्मन्स सुरू होता. ती स्टेजवर मस्त आत्मविश्वासात नाचत-गात होती. तिच्यासाठी तो एक साधा शाळेचा कार्यक्रम असेल, पण खाली बसलेल्या तिच्या वडिलांसाठी तो क्षण खूप खास होता. त्या वडिलांकडे महागडा स्मार्टफोन नव्हता, ना छान कॅमेरा. त्यांच्या हातात होता एक जुना, साधा बटणांचा फोन.

तरीही त्यांनी तोच फोन काढला आणि मुलीचा परफॉर्मन्स रेकॉर्ड करायला सुरुवात केली. व्हिडीओमध्ये दिसतं की, ते फोन नीट धरून अँगल समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित स्क्रीनवर नीट दिसतही नसेल, पण त्यांचे पूर्ण लक्ष फक्त मुलीकडे होतं. तिच्या प्रत्येक स्टेपकडे ते अभिमानाने पाहत होते. हा व्हिडीओ जितेंद्र सारस्वत यांनी शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. फोन साधा असला तरी त्या वडिलांचं प्रेम आणि मुलीचा परफॉर्मन्स कुठल्याही महागड्या फोनपेक्षा खूप मोठा आणि मौल्यवान होता.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक खूप भावूक झाले. अनेकांनी तो शेअर केला आणि प्रतिक्रियांमध्ये त्या वडिलांच्या प्रेमाचं मनापासून कौतुक केलं. जितेंद्र सारस्वत यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, “या भावाने मन जिंकलं.” कुणी म्हटलं, “हा असतो खरा बाबा,” तर कुणी लिहिलं, “आजच्या काळात असे साधे आणि प्रेमळ लोक फार कमी दिसतात.”

काही जणांनी तर विचारलं की या वडिलांना नवीन फोन मिळायला हवा का. पण, बहुतेक लोकांचं म्हणणं एकच होतं, फोन जुना असो किंवा नवा, पण ही आठवण खूप मौल्यवान आहे. अनेकांनी असंही म्हटलं की, मुलीसाठी हा व्हिडीओ जरी थोडा ब्लर असला, तरी ती तिच्या आयुष्यातील सर्वात खास आणि भावनिक आठवण असेल. हा व्हिडीओ पाहून बऱ्याच जणांना आपल्या वडिलांची आठवण आली आणि नात्यांचं खरं मोल पुन्हा एकदा समजलं.