Father Son Emotional Video : वडील -मुलाचं नातं फार अबोल असतं. वडील मुलीवर ज्याप्रकारे सहज प्रेम व्यक्त करताना दिसतात तसं मुलावर दिसत नाही. पण त्यांच मुलावर प्रेम नसतं असं नाही, ते शब्दात व्यक्त करु शकत नाही. पण कठीण वेळ आली तर वडीलचं मुलाची ढाल बनून उभे राहतात. सध्या वडील आणि मुलाचा असाच एक ह्रदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल.
व्हिडीओत एक वडील आपल्या लहान आजारी मुलासाठी जे काही करतात ते पाहून नेटकरीही भावूक झालेत. हा व्हिडिओतून स्पष्ट होते की, एक वडील आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एमआरआय स्कॅनचे केवळ नाव ऐकूनच एक लहान मुलगा खूप घाबरलेला दिसतोय. मशीनचा प्रचंड मोठा आवाज ऐकून तो मुलगा रडू लागतो. त्याला भीती वाटत होती की, त्याला या मशीनच्या आत एकट्याने जावे लागेल आणि त्याचे हातपाय बांधले जातील.
यावेळी आपल्या लाडक्या मुलाच्या वेदना वडिलांना सहन झाल्या नाहीत त्यानंतर त्यांनी मुलाच्या काळजीपोटी असे काही केलं, पाहून नेटकरीही भारावले, व्हिडिओमध्ये, वडील आधी आपल्या मुलाला एमआरआय बेडवर झोपवतात आणि नंतर स्वतःही त्याच्या बाजूने झोपतात. त्यानंतर ते आपल्या मुलाला घट्ट मिठी मारतात, त्याचा चेहरा पूर्णपणे झाकतात. व्हिडिओमध्ये ते दोघेही एकत्र मशीनमध्ये जाताना दिसत आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वडील आपल्या मुलाबरोबरच राहून त्याला मोठा धीर देत राहिले. वडिलांनी मिठीत घेताच थरथर कापणारा मुलगा शांत झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, जगासाठी ते कदाचित फक्त एक वडील असतील, पण त्या मुलासाठी तेच त्याचे संपूर्ण जग होते. व्हिडीओ पाहून नेटकरी देखील खूप भावूक झाले. अनेकांनी वडिलांसारखी माया, प्रेम कोणीही करु शकत नाही असे म्हटले, तर काहींनी वडिलांचे प्रेम शब्दात व्यक्त करणं कठीण असल्याचे म्हटले.
