Father Son Emotional Video Viral : एक दशक जुन्या एका साध्या डायरीने सध्या लाखो लोकांना भावूक केले आहे. इन्स्टाग्रामवरील एका युजरने आपल्या वडिलांची जुनी डायरी वाचतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वडिलांच्या एका साध्या सवयीने मुलाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला, याबद्दलची एक अत्यंत हृदयस्पर्शी चर्चा दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये आशुतोष ही जुनी डायरी हातात घेऊन आपल्या वडिलांना विचारतो की, ही किती जुनी आहे? त्यावर त्याचे वडील उत्तर देतात की, ही साधारण नऊ ते दहा वर्षे जुनी आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ashutoshpratihast या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. डायरीची पाने उलटत असताना आशुतोषचे लक्ष एका गोष्टीकडे जाते, जी डायरीत वारंवार लिहिलेली असते.

या डायरीमध्ये त्याच्या वडिलांनी रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या नोंदी होत्या. त्याच्या वडिलांनी लिहिले होते, ‘घरात फ्रिज असणे हे आमचे भाग्य आहे‌ कारण- त्यामुळे उन्हाळ्यात कुटुंब थंड पाणी पिऊ शकते.’

त्यांनी पुढे लिहिले होते, ‘माझी पत्नी अजिबात उधळपट्टी करत नाही किंवा भांडखोरही नाही. तिने दोन्ही मुलांची माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतली आहे आणि दोन्ही मुलांनी शाळेत नाव कमवले असून, ती हुशार आहेत, त्याबद्दल मी ईश्वरचरणी कृतज्ञ आहे.’ वडिलांच्या या सवयीबद्दल उत्सुकता वाटल्याने आशुतोष त्यांना विचारतो की, त्यांनी या सर्व गोष्टी का लिहून ठेवल्या? त्यावर त्याचे वडील उत्तर देतात की, ‘द सीक्रेट’ (The Secret) हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कृतज्ञतेची (Gratitude) ताकद समजली.

छोट्या गोष्टींनी शिकवल जगण्याचं मोठा तत्त्वज्ञान

मुलगा डायरीतील आणखी काही नोंदी वाचू लागतो. त्याच्या वडिलांनी घरात दोन खुर्च्या असल्याबद्दलही आभार मानले होते, जेणेकरून जेवताना किंवा चहा पिताना कुटुंब एकत्र आरामात बसू शकेल. तसेच थंडीत दोन घोंगड्या (कंबल) असल्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. आशुतोषने पुढे विचारले की, अशा छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवण्याचा काही फायदा झाला का? त्यावर वडिलांनी सांगितले की, याचा नक्कीच खूप मोठा फायदा झाला. डायरीत त्यांनी जे काही लिहिले होते, ती प्रत्यक्षात त्यांच्या स्वप्नांची यादी (Dream List) बनली.

आशुतोष सांगतो की, डायरीमध्ये कुकर, सीलिंग फॅन, फ्राईंग पॅन, शोकेस, कपाट, सोफा, सोफा टेबल आणि अगदी वाय-फायसारख्या अगदी साध्या आणि छोट्या इच्छांचाही समावेश होता. वडिलांचे म्हणणे आहे की, लोकांकडे जे काही आहे, त्याबद्दल त्यांनी कृतज्ञ राहिले पाहिजे आणि ज्या गोष्टी मिळवण्याची ते इच्छा बाळगतात, त्याबद्दलही आभार मानले पाहिजेत. व्हिडीओच्या शेवटी आशुतोष डायरीतील एक ओळ वाचतो, ज्यामध्ये लिहिले आहे, ‘जर एखादी व्यक्ती एक गोष्ट देते, तर त्याला सर्व काही मिळेल. परंतु, जर तो ती एक गोष्ट देण्यात अयशस्वी ठरला, तर त्याच्याकडे जे काही आहे तेदेखील तो गमावून बसेल.’ पुढे वाचताना ते स्पष्ट करतात की, डायरीत ज्या ‘एका गोष्टीचा’ उल्लेख केला आहे, ती म्हणजे ‘कृतज्ञता’ (Gratitude) होय.