Father Saves Daughter Cruise Ship: सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी आणि अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका वडिलांनी आपल्या मुलीसाठी जे धाडस दाखवलं, त्यानं लाखो लोकांची मनं जिंकलीत. हे दृश्य आहे विशालकाय अटलांटिक महासागराचं. एका १४-डेक डिज्नी क्रूझवरून एक लहान मुलगी अचानक समुद्रात कोसळते. चोहोबाजूंनी महाकाय लाटा उसळत असताना, आपल्या मुलीला डोळ्यांसमोर बुडताना पाहून वडिलांनी क्षणाचाही विचार न करता, थेट त्या सागरात उडी घेतली अन् पुढे काय घडलं ते जाणून घ्या…
नजरेला न दिसणाऱ्या खोल समुद्रात… आणि एक थरार
ही घटना २९ जून रोजी घडली. डिज्नी ड्रीम नावाची ही लक्झरी क्रूझ बहामाजवरून फ्लोरिडा, फोर्ट लॉडरडेलकडे परत येत होती. रिपोर्टनुसार, मुलगी डेक ४ वर वॉकिंग ट्रॅकवरून चालताना अचानक खाली पडली. रिपोर्टनुसार, तेव्हा तिचे वडील तिचा फोटो काढत होते, आणि त्या क्षणीच ही दुर्घटना घडली.
जशी मुलगी पाण्यात पडली, तसा तिच्या वडिलांनी काहीएक विचार न करता, जीव धोक्यात घालून समुद्रात उडी घेतली. व्हिडीओमध्ये दिसतंय की, समुद्राच्या मध्यभागी एक माणूस (वडील) आणि एक मुलगी पाण्यात तरंगताना दिसतात. काही वेळात बचाव बोट त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यांना दोघांनाही सुखरूप वर खेचलं जातं.
वडिलांनी स्वतःला विसरून फक्त मुलीचा जीव वाचवला
हा व्हिडीओ जहाजावरील एका प्रवाशाने शूट केला असून, Daily Mail आणि BBC यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांनी तो शेअर केला आहे. युजर्स त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. कुणी म्हणतं, “आईवडिलांचं प्रेम असंच असतं!”, तर कुणी म्हणतं, “धन्य आहेत असे वडील!”
USA Today च्या रिपोर्टनुसार, वडिलांनी तब्बल २० मिनिटं आपल्या मुलीला पाण्यावर ठेवून तिला सांभाळलं. सुदैवानं, कोणीही जखमी झालं नाही. आपत्कालीन यंत्रणा तातडीनं सक्रिय करण्यात आली आणि नंतर संपूर्ण जहाज सुरक्षितपणे फ्लोरिडा बंदरावर पोहोचलं.
येथे पाहा व्हिडीओ
Disney Cruise ने दिली अधिकृत माहिती
डिज्नी क्रूझ लाइनचे प्रवक्ते म्हणाले, “डिज्नी ड्रीमवर आमच्या क्रू मेंबर्सनी अतिशय तत्परतेने कारवाई करीत दोन्ही पाहुण्यांना सुखरूप जहाजावर परत आणलं. त्यांच्या धाडसी कृतीबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लाखो लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि एकच वाक्य ऐकायला येतंय, “पप्पा… खरंच सुपरमॅन असतो”.