फिलिपिन्समधील एका महिलेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील फोटोग्राफीची एक स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेमध्ये पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या महिलेने तिच्या रिझाल येथील बिनांगोननमध्ये असणाऱ्या घराजवळ दोन मुंग्यांचा फोटो क्लिक केला आणि स्पर्धेसाठी पाठवला. एका पानावरील थेंबामधून या दोन मुंग्या पाणी पिताना दिसत आहेत. टेक्नोलॉजी डॉट इक्युरियर डॉट नेट या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा अगोरा या फोटो शेअरिंग वेबसाईटने वॉटर २०२० या थीमअंतर्गत आयोजित केली होती. एप्रिल महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये अॅनालिझा दारन दी गुझमॅन (Analiza Daran De Guzman) या महिलेने एक हजार डॉलरचे पहिले पारितोषित जिंकले आहे.
अॅनालिझा ही तीन मुलांची आई असून छंद म्हणून स्मार्टफोनमधून फोटग्राफी करते. तिने काढलेला पुरस्कार विजेता फोटो हा स्मार्टफोनमधून मायक्रो लेन्स लावून काढला आहे. हा एक फोटो काढण्यासाठी तीला चार तासाचा कालावधी लागला. आधी अॅनालिझा ही डिएसएलआर कॅमेराने फोटो काढायची. मात्र २०१६ साली एका सहलीदरम्यान तिचा कॅमेरा बिघडला. त्यानंतर तिने कॅमेरा विकत घेण्याऐवजी स्मार्टफोनच्या माध्यमातून आपला फोटो काढण्याचा छंद सुरुच ठेवला.
मोबाइल फोटोग्राफीच्या छंदामुळेच अॅनालिझा ऑनलाइन मोबाइल फोटोग्राफी ग्रुपची सदस्य झाली. तिथे तिने अनेकांनी मोबाइल फोटोग्राफीसंदर्भातील लहान मोठ्या टीप्स दिल्या आणि मार्गदर्शन केलं. ज्यामुळे तिच्या फोटोग्राफीमध्ये सुधारणा होत गेली. तिथेच ती लेन्स लावून मोबाइलवर फोटो कसे काढतात हे शिकली. पुरस्कार जिंकणारा मुंग्यांचा फोट काढताना तिने ट्रायपॉडचा वापर केला नाही. मुंग्या या जास्त काळ एका ठिकाणी थांबत नाही त्यामुळेच मी ट्रायपॉड वापरला नाही असं अॅनालिझा सांगते.
अॅनालिझाने पुरस्कार मिळवणाऱ्या फोटोबरोबर पाण्याबरोबर आणि फुलांबरोबर खेळणाऱ्या मुंग्यांचेही फोटो काढले आहेत. यापैकी डोक्यावर पाण्याचा थेंब संभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंगीचा फोटो हा माझा सर्वात आवडता फोटो असल्याचं अॅनालिझा सांगते.
“आधी मी फुलं आणि मुंग्यांचे फोटो काढत होते. तितक्यात मला मुंग्या पाण्याशी खेळताना आणि पाणी पिताना दिसल्या. त्यामुळे मी तेही फोटो काढले. इतर कोणत्याही किड्यांपेक्षा मुंग्या फोटोमध्ये जास्त आकर्षक दिसतात,” असं अॅनालिझाने सांगितलं.
अॅनालिझा फॅशन फोटोग्राफीही करते. तिला मूळ उद्योग हा पर्यटनाशी संबंधित असून तिची स्वत:ची एक ट्रॅव्हल एजन्सी आहे. त्याचप्रमाणे ती एक छोटं हॉटेलही चालवते.