फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा मैत्रिणीसोबत पार्टी करतानाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि यानंतर वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले. हीच संधी साधत ३६ वर्षीय सना मरीन यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. हा वाढ इतका पेटला की यानंतर सना मरीन याची ड्रग्स चाचणी घेण्याची मागणीही जोर पकडू लागली.

दरम्यान, “मी सर्व कायदेशीर गोष्टी केल्या आहेत” असं सना मरीन यांनी म्हटलं आहे. “माझ्याकडे कौटुंबिक आणि कामाच्या आयुष्याव्यतिरिक्त मोकळा वेळही आहे, जो मी मित्रांसोबत घालवते,” असं सना मरीन यांनी स्पष्ट केलं. ही घटना घडल्यानंतर दोन्ही बाजूने अनेक तर्क वितर्क मांडण्यात आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सना मरीन यांची ड्रग्ज चाचणी करण्याची मागणी केल्याचं वृत्त बीबीसीने दिलं होतं. फिनलँडमध्ये देशांतर्गत समस्या असतानाही पार्टी केल्याबद्दल इतर राजकीय नेत्यांनीही त्यांच्यावर टीका केली. तर एखाद्या नेत्याने मोकळा वेळ आपल्या मित्रांसोबत घालवण्यात काही चुकीचं नाही असं म्हणत काही नागरिकांनी सना मरीन यांना पाठिंबा दिला आहे.

फिनलॅण्डच्या महिला पंतप्रधानांच्या Party Dance वरुन वाद पण ‘या’ नेत्यांचे डान्सही झालेले व्हायरल; पाहा Videos

पंतप्रधान सना मरीन यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी फिनलंडमधील अनेक महिलांनी ‘सॉलिडॅरिटीविथसन्ना’ या हॅशटॅगसह त्यांचे नृत्य आणि पार्टी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच, मरीन यांना इतर अनेक व्यक्तीही पाठिंबा दर्शवत आहेत. एका युजरने म्हटले, “एक अमेरिकन म्हणून, मला या गोष्टीने धक्का बसला आहे की फिनलँडच्या पंतप्रधानांनी सामान्य माणसांसारख्या गोष्टी करण्याला घोटाळा म्हटले जात आहे. तुम्ही सर्वांनी बाकीचे जग पहिले आहे का?”

“ती हुशार आहे, ती तत्त्वनिष्ठ आहे, ती सुंदर आहे… तिला राजकीय ठिकाणी कसे वागायचे हे माहित आहे…. आणि आता आम्ही काय पाहतो? तर ती पार्टी करते आणि मुलींसोबत नाचते.” दुसऱ्याने लिहिले. “आम्ही किती ‘बलवान’ आहेत हे सिद्ध करण्यासाठी रागावण्याऐवजी आणि एकमेकांवर शस्त्रे सोडण्याऐवजी नेत्यांनी डान्स केला तर हे जग अधिक चांगले होईल,” तिसऱ्याने सांगितले.

देशाच्या वाहतूक मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या सना मरीन यांनी २०१९ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली. वयाच्या ३४ व्या वर्षी शपथ घेतल्यानंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅसिंडा यांना मागे टाकत त्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या.