एका तरुणीनं कॅब चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ लखनऊ शहरातील अवध क्रॉसिंगजवळचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर #ArrestLucknowGirl हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत होता. हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर तीन दिवसांनी जी महिला रस्त्यात एका पुरुषाला मारहाण करताना दिसत आहे तिच्याविरोधात लखनऊ पोलिसांनी सोमवारी कृष्णा नगर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवला आहे. नेटकऱ्यांची या मुलीला अटक करण्याची मागणी केली होती.

लखनऊ पोलिसांची कारवाई

आयपीसी कलम ३९४ आणि ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. मध्यवर्ती (लखनऊ) अतिरिक्त पोलीस उपायुक्त चिरंजीव नाथ सिन्हा म्हणाले की, कॅब चालक असलेल्या एका व्यक्तीने सोमवारी महिलेविरोधात तक्रार दाखल केली.पोलिसांनी सांगितले की, तक्रारदाराचा असाही आरोप आहे की तिने त्याचा मोबाईल हिसकावून तो तोडला.याआधी शुक्रवारी, अवध क्रॉसिंगवर दोन व्यक्तींमध्ये “हाणामारी” झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यांनी तरुण आणि तरुणीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते.

काय होती घटना

त्या व्हिडिओत एक तरुणी भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण करताना दिसत होती. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. या चालकानं तिला धडक दिल्याचं ही तरुणी ओरडून सांगत होती. दरम्यान, हा गोंधळ सुरू असताना एक वाहतूक पोलीस तिथं येतो आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही ती त्या चालकाला मारणं थांबवत नाही. शिवाय त्याचा फोनही तोडून टाकते. ही मुलगी उद्धट आहे, असं अनेकजण म्हणत असल्याचं या व्हिडिओत ऐकू येत होतं.

नेटकऱ्यांची मुलीला अटक करण्याची मागणी

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत या तरुणीला अटक करण्याची मागणी केली होती. काही नेटकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना टॅग करून या तरुणीविरोधात कारवाई करा, असही म्हटलं होत. तर, हा व्हिडिओ शेअर करत “हेच स्त्री सक्षमीकरण आहे का?” असा सवालही काहींनी उपस्थितीत केला होता. “या तरुणीने भररस्त्यात केलेल्या कृत्याचं कोणीच समर्थन करणार नाही. ती पूर्णपणे चुकीची वागली आहे. मध्यस्थी करणाऱ्यालाही तिने मारहाण केली आहे, ही तरुणीच आरोपी आहे,” असं एका युजरने म्हटलं होत.