Foreign Dancers Perform on Lollipop Lagelu in Baku Viral Video Wins Hearts: सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. रोज हजारो व्हिडीओ इंटरनेटवर फिरत असतात, पण काही क्षण असे असतात जे थेट मन जिंकून घेतात. हाच अनुभव सध्या अनेकांना येतोय, कारण हा व्हिडीओ आहे भारतापासून हजारो किलोमीटर दूर, पण भारतीय संगीताच्या ठेक्यावर थिरकणाऱ्या विदेशी कलाकारांचा!

ही घटना आहे अझरबैजानची राजधानी बाकू येथील. येथे आयोजित ‘इंडियन फूड फेस्टिव्हल’दरम्यान एक अनपेक्षित, पण अत्यंत रंगतदार प्रसंग घडला. कार्यक्रमात सर्वजण विविध भारतीय पदार्थांचा आस्वाद घेत होते, वातावरणात उत्साह ओसंडून वाहत होता आणि त्याच वेळी अचानक वाजू लागलं एक गाणं; जे ऐकताच अनेक भारतीयांच्या आठवणी ताज्या होतात…

होय, तेच गाणं ‘लॉलीपॉप लागेलू’!

गाणं लागताच मंचावर आले दोन विदेशी कलाकार, प्रसिद्ध अझरबैजानी नर्तक शिरखान आणि आलिया. पुढच्या काही क्षणांत त्यांनी जे सादर केलं ते पाहून उपस्थित प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले. त्यांच्या प्रत्येक स्टेपमध्ये उत्साह, ऊर्जा आणि भारतीय गाण्याबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसत होतं.

हा कार्यक्रम भारतीय दूतावासात ‘अन्नपूर्णा दिवस’ निमित्त आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा संपूर्ण व्हिडीओ Embassy of India in Baku च्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. सुमारे २ मिनिटे २० सेकंदांचा हा व्हिडीओ पाहता-पाहता हजारो लोकांपर्यंत पोहोचला आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ पाहून नेटकरी करतायत कौतुक.

व्हिडीओमध्ये विदेशी कलाकार भोजपुरी ठेक्यावर ज्या जोशात नाचताना दिसतात, ते पाहून अनेक भारतीयांनी अभिमान व्यक्त केला आहे. “भारतीय संगीताची ताकद जगभर पोहोचली आहे,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

या सगळ्यात आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे गाणं आजचं नाही, पवन सिंह यांचं ‘लॉलीपॉप लागेलू’ हे गाणं २००८ साली रिलीज झालं होतं; त्या वेळी ते फक्त २२ वर्षांचे होते. या एकाच गाण्याने त्यांना रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं.

आता तब्बल १८ वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ अजूनही तशीच आहे, याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा व्हायरल व्हिडीओ.

खरंच, भाषा वेगळी असली तरी संगीताची ताकद जगाला एकत्र आणते हे या डान्सने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे!

येथे पाहा व्हिडीओ