scorecardresearch

“गाढव हा गाढवच राहतो”; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:लाच दिली गाढवाची उपमा

या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकरीही त्यांची खिल्ली उडवत आहेत.

imran khan
इम्रान खान (फाईल फोटो)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी स्वतःचीच खिल्ली उडवली आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्वत:लाच गाढवाची उपमा दिली आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकरीही त्यांची खिल्ली उडवत आहेत.

द सेंट्रम मीडिया नावाच्या यूट्यूब चॅनलच्या शो दरम्यान इम्रान खान पाकिस्तान आणि राजकारणावर बोलत होते. यावेळी होस्टने त्यांना ‘पाकिस्तानी लोक देश सोडून का जातात?’ असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना इम्रान यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, “मी सुद्धा २०-३० वर्षे बाहेर होतो, क्रिकेट खेळायचो पण मला कधीच मी त्यांच्यातला वाटलो नाही, मी त्या समाजाचा एक भाग होतो आणि त्यांनी मला मनापासून स्वीकारले होते. ब्रिटीश समाजात अशा प्रकारे स्वीकारणारे फार कमी लोक आहेत. पण इतकं होऊनही मी ते घर कधीच मानलं नाही, कारण मी पाकिस्तानी होतो.”

इम्रान इथेच थांबले नाहीत, पुढे ते म्हणाले की, “मला जे हवे होते तेच मी करत होतो, कारण मला माहिती होते मी इंग्रज होऊ शकत नाही. जर तुम्ही गाढवावर पट्टे ओढले तर गाढवाचा झेब्रा होऊ शकत नाही. गाढव ते  गाढवच राहील”, असं म्हणत त्यांनी स्वतःची तुलना गाढवाशी केली. इम्रान खान यांचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेक जण याबर मीम्स बनवताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former pakistan prime minister imran khan called himself donkey in an interview dpj