Viral Friendship Video :मैत्री म्हणजे जगातील सर्वात सुंदर आणि निस्वार्थ नातं. जेव्हा कोणी आपल्या आनंदात मनापासून आनंदी होते, आपल्याला हसताना पाहून हसते आणि आपल्या दुःखात साथ देते, संकटात खांद्याला खांदा लावून उभा राहते ती खरी मैत्री असते. मैत्री म्हणजे स्पर्धा नाही, तर एकमेकांना पुढे जाण्याची प्रेरणा देणे आणि यश मिळाल्यानंतर तितक्याच आनंदाने टाळ्या वाजवणे,कौतुक करणे, तसेच अपयश आल्यानंतर आधार देणे हीच खरी मैत्री असते.
मैत्री म्हणजे दिलेला शब्द पाळणं, स्वार्थ न ठेवता एकमेकांना कायम साथ देणे. कधी खांद्यावर हात ठेवून चालणं, तर कधी त्याच खांद्यावर बसवून त्याचा आनंद साजरा करणं—यालाच खरी मैत्री म्हणतात. अशाच एका सुंदर मैत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या कोल्हापुरातील दोन जिवलग मित्रांची मैत्री चांगलीच चर्चेत आली आहे. आपला मित्र भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर तरुणाला झालेला आनंद व्हिडीओमध्ये दिसत आहे. मित्राचे यश साजरा करण्यासाठी तरुणाने त्याला अक्षरशः खांद्यावर बसवून संपूर्ण गावात फिरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जिगरी मैत्रीचा अनोखा जल्लोष (A Unique Celebration of Friendship)
रोहित जोंधळे आणि संतोष माने हे कोल्हापुरातील दोन जिवलग मित्र. नुकतीच रोहितची १०९ इन्फंट्री TA मराठा बटालियनमध्ये भारतीय सैन्यात निवड झाली. रोहितच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र हा आनंद सर्वात जास्त कोणाला झाला असेल तर तो त्याचा मित्र संतोष माने यालाच. संतोषने काही वर्षांपूर्वी रोहितला एक शब्द दिला होता – “तू अंगावर वर्दी चढव, मी तुला खांद्यावर घेऊन अख्खा गाव फिरवीन.” रोहितची सैन्यात निवड झाली तेव्हा संतोषने दिलेला शब्द पाळला अन् रोहितला खांद्यावर बसवून आनंदाने गावात फिरवले. याच जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी या मैत्रीचे कौतुक करत आहेत.
मित्राने दिलेला शब्द पाळला (A Promise Kept with Pride)
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संतोष माने हा रोहित जोंधळेला खांद्यावर उचलून गावातून फिरवत असल्याचे दिसते. गावकरी देखील या आनंदाच्या क्षणात सहभागी झाले होते. गुलाल उधळत ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषाच्या वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. हा क्षण केवळ मित्राच्या यशाचा उत्सव नव्हता, तर देशसेवेसाठी सैन्यात जाणाऱ्या तरुणाबद्दल समाजात असलेला अभिमानही यातून दिसून येतो.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव (Praise on Social Media)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून नेटकऱ्यांनी या दोघांच्या मैत्रीचे कौतुक केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या मैत्रीचे कौतुक करत “खरंच मित्र म्हणजे मित्रच असतात, ग्रेट भावा” अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी “खरा जिवलग मित्र भेटायला नशीब लागतं, आयुष्यभर अशीच मैत्री जपा” असे म्हणत अभिनंदन केले. तर “तुमच्यासारखे खांद्यावर घेऊन मिरवणारे मित्र असले की असे वाघ तयार होतात”, “वाघ भरती झाला हे पाहून अंगावर काटा आला” अशा भावनिक प्रतिक्रिया उमटल्या.
अनेकांनी संतोष मानेच्या आनंदाकडे लक्ष वेधत “भाऊ, त्यापेक्षा जास्त आनंद तुलाच झाल आहे” असेही म्हटले. काहींनी या घटनेला मैत्रीचे जिवंत उदाहरण म्हणत “दोस्ती म्हणजे खांद्यावर बसून मिरवायचा असते, पुढे जाणाऱ्या मित्राचे पाय मागे खेचणे नव्हे” अशी भावना व्यक्त केली. “दिलेला शब्द पाळला, यालाच जिगर म्हणतात”, “डोळ्यात पाणी आलं… जिगरी मित्र”, “मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण”, “निःस्वार्थ मैत्री काय असते याचं जिवंत उदाहरण” अशा अनेक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी या दोघांच्या मैत्रीला सलाम केला.
काहींनी तर “यशाचा सोहळा साजरा करायला मित्रही तेवढाच हौशी लागतो”, “असा एक मित्र असला की DJ कशाला लागतो” असे म्हणत त्यांच्या मैत्रीला कोणाची नजर लागू नये अशीही शुभेच्छा दिल्या.
मित्र असावा तर असा! Video Viral
दोस्ती, वादा आणि देशभक्तीची मिसाल (A Story of Friendship, Promise and Patriotism)
एका मित्राने दिलेला शब्द पाळत दुसऱ्या मित्राच्या यशाचा केलेला हा जल्लोष सध्या नेटकऱ्यांच्या मनाला भिडला आहे. निःस्वार्थ मैत्री, दिलेल्या शब्दाची किंमत आणि देशसेवेचा अभिमान — या तिन्ही भावना या व्हिडीओतून ठळकपणे दिसून येतात.
