केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ९६ वा क्रमांक मिळवून भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झालेल्या निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती झाली आहे. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील या अत्यंत महत्त्वाच्या पदापर्यंत मजल मारली आहे.
शिक्षण आणि यूपीएससीचा खडतर प्रवास
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जन्मलेल्या निधी तिवारी यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. नागरी सेवेत दाखल होण्याचा त्यांचा मार्ग चिकाटी आणि कठोर परिश्रमांचा राहिला.
BARC च्या शास्त्रज्ञ ते यूपीएससीपर्यंत मजल
निधी तिवारी यांची भाभा अणुसंशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली होती. मात्र तिवारी यांना धोरणनिर्मिती आणि सार्वजनिक प्रशासनामध्ये योगदान द्यायचे होते. त्यामुळे २००८ मध्ये त्यांनी शास्त्रज्ञ पदाचा राजीनामा दिला आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
नागरी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी वाराणसीमध्येच वाणिज्य कर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणूनही काही काळ काम पाहिले होते. त्यानंतर २०१३ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत त्यांनी देशभरातून ९६ वा क्रमांक पटकावला आणि २०१४ च्या बॅचमधून भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) त्या रुजू झाल्या.
परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेचा प्रदीर्घ अनुभव
परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असताना निधी तिवारी यांनी नि:शस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यांशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळल्या. या कामातून त्यांना जागतिक राजकारण आणि धोरणात्मक विषयांचा दांडगा अनुभव मिळाला, ज्याचा मोठा उपयोग पुढील काळात झाला.
पंतप्रधान कार्यालयातील यशस्वी वाटचाल
नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयात अवर सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांच्या पदोन्नतीसह उपसचिव म्हणून त्यांच्यावर परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.
प्रशासनातील सातत्यपूर्ण कामगिरी, शैक्षणिक गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमधील दांडगा अनुभव यांच्या बळावर आता त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च कार्यकारी कार्यालयात बजावलेली ही कामगिरी त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे.
