Fuel Shortage Rumours India: देशभरात सध्या एक धक्कादायक आणि चिंताजनक परिस्थिती पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अचानक पसरलेल्या एका अफवेने लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि पाहता पाहता, अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर अभूतपूर्व गर्दी उसळली. मात्र, ही गर्दी केवळ गाड्यांसाठी नव्हती… लोक ज्या पद्धतीने पेट्रोल साठवू लागले, ते पाहून सर्व जण चक्रावले आहेत.
काही ठिकाणी लोकांनी आपल्या गाड्यांच्या टाक्या भरल्या, हे अपेक्षितच होतं; पण त्यापलीकडे जाऊन काही जण कुकर, बादल्या, पाण्याच्या टाक्या, दुधाचे डबे, प्लास्टिकचे ड्रम आणि अगदी घरात मिळेल त्या भांड्यात पेट्रोल भरून घेताना दिसले. या विचित्र प्रकारामुळे अनेक जण हैराण झाले आहेत. ‘जे काही मिळेल, त्यात पेट्रोल भरा’ अशी स्पर्धाच जणू लागल्यासारखं चित्र निर्माण झालं आहे.
नेमकी कशी पसरली ‘ही’ अफवा?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यामध्ये काही राज्यांतील पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी दिसत होती. विशेषतः गुजरातमधील काही ठिकाणचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाले, त्या व्हिडीओंमध्ये लोक वेगवेगळ्या भांड्यांमध्ये पेट्रोल भरताना दिसत होते, ते पाहून इतर राज्यांतील लोकांमध्येही भीती निर्माण झाली.
लवकरच ही भीती आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांपर्यंत पोहोचली. परिणामी पेट्रोल-डिझेलची मोठी टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने अनेकांना ग्रासले. त्यामुळे त्यांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावून जास्तीत जास्त इंधन साठवण्याचा प्रयत्न सुरू केला.
परिणाम काय झाला?
अनेक शहरांमध्ये लोकांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या. परिणामी त्यांना तासन् तास प्रतीक्षा करून पेट्रोल घ्यावे लागत होते. दरम्यान, सरकार आणि तेल कंपन्यांनी या अफवांवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत पेट्रोलियमने सांगितले की, देशात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नाही. पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. सरकारकडूनही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तज्ज्ञांनी मात्र या प्रकारावर गंभीर इशारा दिला आहे. कुकर, प्लास्टिकचे डबे किंवा बादल्यांमध्ये पेट्रोल साठवणे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. पेट्रोल अतिशय ज्वलनशील असल्याने अशा प्रकारे साठवण केल्यास आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
सध्या देशात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. टंचाईबाबतची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता, शांत राहणे आणि योग्य त्या माहितीवरच विश्वास ठेवणे सर्वार्थाने अत्यावश्यक आहे.
