Funny Dance Video : सोशल मीडिया हे एक असं अजब व्यासपीठ आहे, जिथे रोज काहीतरी नवीन आणि विचित्र पाहायला मिळतात. कधी कोणी आपल्या टॅलेंटनं थक्क करतं, तर कधी कोणी आपल्या ‘अतरंगी’ फॅशनने नेटकऱ्यांचं डोकं चक्रावून सोडतं. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये हा तरुण चक्क अंगावर केळीची पानं बांधून पंछी बनूँ उड़ती फिरूँ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतोय.

या डान्समध्ये त्यानं अशा काही स्टेप्स केल्यात की, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण डोक्यावर आणि पाठीला झाडाची फांदी बांधलीय, तर पायांनाही त्यानं झाडूप्रमाणे काहीतरी बांधलंय. इतकंच नाही, तर हातांनाल पक्ष्यांच्या पंखांप्रमाणे केळीची दोन पानं गुंडाळली आहेत आणि संपूर्ण शरीरावरही त्यानं केळीच्या पानांचे तुकडे गुंडाळलेत. अशा अतरंगी अवस्थेत तो ‘पंछी बनूँ उड़ती फिरूँ’ गाण्यावर मजेशीर डान्स करतोय. पण, ज्या पद्धतीनं तो पक्ष्यांप्रमाणे उड्या मारत नाचतोय, ते पाहून खरंच तुमचं डोकं चक्रावून जाईल.

‘पंछी बनूँ उड़ती फिरूँ’ गाण्यावर मजेशीर डान्स

त्याची ही ‘केळीच्या पानांची फॅशन’ आणि डान्समधील आत्मविश्वास पाहून नेटकरी हसून हसून वेडे झाले आहेत. ‘बाई, काय हा डान्स!’ अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहणारे अनेक जण व्यक्त करीत आहेत. तरुणाचा हा अतरंगी डान्स व्हिडीओ dialog_superstar_28 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करतायत. एकानं लिहिलंय की, हा कोणता पक्षी आहे मोर. दुसऱ्यानं लिहिलंय की, उर्फी जावेदचा भाऊ आहे वाटतं हा. तिसऱ्यानं लिहिलं की, व्वा, मस्त, जबरदस्त कपडे, कमाल अभिनय आणि मजेशीर डान्स.