विमानामध्ये प्रवासदरम्यान प्रवाशांमध्ये वाद-विवाद ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. कधी सीटवरून, कधी सामानाच्या जागेवरून तर कधी शुल्लक कारणावरूनही भांडणं होतात. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ लोकांना पोट धरून हसण्यास भाग पाडत आहे.. कारण या व्हिडीओमध्ये प्रवाशांमध्ये भांडण जरी सुरू असलं, तरी त्यातला सगळ्यात मजेशीर क्षण म्हणजे एका आईने स्वतःच्या मुलालाच चापट मारली आहे.
हा व्हिडीओ विमान प्रवासातील आहे, जिथे एक महिला प्रवासी आणि दोन पुरुष प्रवाशांमध्ये सीटच्या जागेवरून वाद होतो. सुरुवातीला वाद कमी वाटतो, पण काही क्षणांतच आवाज चढतो आणि वातावरण तणावपूर्ण बनते. महिला जोरजोरात आरडाओरडा करू लागते आणि त्यामुळे विमानामधील इतर प्रवासी त्रस्त होतात. अखेर एअरहोस्टेस मध्ये पडते आणि दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करते.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की ती महिला सतत आपली बाजू सिद्ध करण्याच्या प्रयत्नात दोन पुरुषांवर ओरडते आहे. एअरहोस्टेस येऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण महिला तिच्याशीही वाद घालते. त्याचवेळी तिच्याबरोबर प्रवास करणारा मुलगा मध्ये बोलतो आणि तो आपल्या आईला शांत राहायला सांगतो.
पण, आईला हे अजिबात आवडत नाही आणि ती चिडून सर्वांच्या समोरच मुलाच्या गालावर एक चापट मारते. जे पाहून इतर प्रवाशांनाही हसू येते तर काही जण व्हिडीओ काढायला सुरुवात करतात. हा प्रसंग एवढा अनपेक्षित होता की लोकांना हसावं की चिडावं हेच समजलं नाही. व्हिडीओ सोशल मीडियावर टाकताच काही मिनिटांत तो व्हायरल झाला आणि हजारो लोकांनी तो पाहिला.
पाहा व्हिडिओ
या व्हायरल व्हिडीओवर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं “एअरहोस्टेससमोर आईला ज्ञान देत होता, आता मिळाली शिक्षा!” तर दुसऱ्याने विनोदाने म्हटलं — “आईला आधीच कळलं होतं, हा पुढे जाऊन बायकोची साइड घेईल!” आणखी एका युजरने लिहिलं — “आई म्हणजे आई असते, कुठेही आपल्या लेकराला सोडत नाही.” काहींनी या घटनेवर गंमत केली, तर काहींनी आईच्या वागण्यावर नाराजीही व्यक्त केली. पण, बहुतेक लोकांसाठी हा व्हिडीओ एक भन्नाट कॉमेडी सीन ठरला आहे.
विमानामधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. एका बाजूला प्रवाशांमधील वाद दिसतो, दुसरीकडे, आई-मुलाच्या नात्यात काही मजेदार क्षण असतात. लोक म्हणतात, “आईच्या हाताचे प्रेम कधीकधी चापटीतून मिळते”
