Viral Video of dog stealing and eating Modak: सध्या देशभरात गणेशोत्सवानिमित्त उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. घरोघरी, गल्लोगल्ली, मोठमोठ्या मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आणि या सणाला सुरुवात झाली. घरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर नैवेद्य, आरती, भजन, मंगळागौर यांची लगबग सगळीकडे पाहायला मिळते. यादरम्यान, सोशल मीडियावर गणेशोत्सवाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक गोड व्हिडीओ व्हायरल होतोय; जिथे श्वान थेट बाप्पाच्या हातातून मोदक पळवून नेतो.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video of dog stealing and eating Modak)
व्हायरल झालेल्या व्हिडीओची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. व्हिडीओ सुरू होताच आपण पाहू शकतो की, श्वानाचं पिल्लू बाप्पाच्या मूर्तीच्या अगदी जवळ जाऊन उभं राहतं. या बाप्पाच्या मूर्तीच्या हातात एक मोदक असतो. हा मोदक कसा बरं घ्यायचा या प्रयत्नात श्वानाचं पिल्लू असतं. हळूहळू मूर्तीजवळ जात श्वान बाप्पाच्या हातातला मोदक हळूच खाली पाडतो आणि तो तोंडात धरून तिथून पळ काढतो.
हा व्हिडीओ @streetanimalsofmumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर “गणपती बाप्पाासाठी तयार केलेल्या मोदकांचा मोह कोणालाही आवरत नाही. या लहानशा खोडकर भक्ताला बाप्पासमोरून गोड नैवेद्य चोरताना पकडले. निरागसतेचे हे कृत्य पाहून बाप्पा नक्कीच हसत असावेत. शेवटी आपल्या या प्राणी मित्रांनाही मोदक आवडतात!”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला ४१ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
हा क्यूट व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “आता हा मोदक सरळ त्याच्या पोटात जाणार, असं दिसतंय.” तर दुसऱ्याने, “सो स्वीट”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “आधी त्यानं बाप्पाचे चरण स्पर्श करून परवानगी घेतली आणि मगच मोदक घेतला.”
दरम्यान, सोशल मीडियावर याआधीही गणेशोत्सवात प्राण्यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. श्वान दोन्ही हात जोडून बाप्पाला नमस्कार करतानाचा व्हिडीओ गेल्या वर्षी व्हायरल झाला होता. हत्तीने गणरायाच्या गळ्यात सोंडेच्या मदतीने फुलांची माळ घातली होती, तो व्हिडीओही चर्चेत होता.