गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर त्याच्या भोवतीची सजावट आणि खास देखाव्यांची विशेष चर्चा रंगते. यात अनेक घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खास देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. पण जिवंत देखाव्यांची परंपरा आजही अनेक लोक जपत आहेत. अशाप्रकारे एका घरगुती गणपती देखाव्याद्वारे रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीतील दरड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गावकऱ्यांना भावनिक श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या देखाव्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी गावावर १९ जुलैच्या मध्यरात्री दरड कोसळली, ज्यात शेकडो संसार उदध्वस्त झाले. सतत होणाऱ्या मुसळधार पावसात अचानक दरड कोसळली आणि त्याखाली संपूर्ण गाव गाडलं गेलं. यात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आणि अनेकांचे आयुष्य एका क्षणात बदलले. या घटनेने व्यथित झालेल्या एका व्यक्तीने यंदा गणेशोत्सवात पीडितांना श्रद्धांजली देण्यासाठी गणपती बाप्पाच्या भोवती खास इरशाळवाडी गावाचा देखावा तयार केला आहे. या व्यक्तीने बाप्पाच्या भोवती दरड दुर्घटनेनंतर उदध्वस्त इरशाळवाडीची प्रतिकृती साकारली आहे. त्यांनी या गावातील उदध्वस्त झालेली घरं हुबेहूब साकारून पीडितांना श्रद्धांजली वाहिली आहे. या देखाव्यात इरशाळवाडी दरड दुर्घटनेनंतरच्या अतिशय भावनिक गोष्टींचाही समावेश केला आहे. यामुळे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची रिघ लागली आहे. इरशाळवाडी दरड दुर्घटनेवर आधारित गणपतीचा देखावा देखाव्याच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दरड दुर्घटनेनंतर इरशाळवाडीची झालेली अवस्था हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात डोंगराचा कोसळलेला भाग, मोडलेली घरे, झाडं दाखवण्यात आली आहेत. हा देखावा पाहून आता सोशल मीडियावरील युजर्सही त्या दुर्घटनेची आठवण काढून भावनिक होत आहेत.