Gen Z Lifestyle Reddit Viral Post: सोशल मीडियावर सध्या एका Reddit पोस्टमुळे “स्पेंड-इट-ऑल” म्हणजेच मिळालेला पगार पूर्ण खर्च करण्याच्या ट्रेंडवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नवीन नोकरी लागलेल्या तरुणाने आपल्या कॉलेजमधील मित्रांना दिलेल्या प्रॉमिससाठी संपूर्ण महिन्याचा पगार तीन दिवसांच्या पार्टीवर खर्च केल्याची कबुली दिली आहे.
त्या तरुणाने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले की, कॉलेजमध्ये असताना त्याने मित्रांना “पगार आला की तो पूर्ण तुमच्यावर खर्च करेन” असे वचन दिले होते. नोकरी लागल्यानंतर त्याने हे वचन पाळत मित्रांसोबत जोरदार सेलिब्रेशन केले. फ्लाइट, राहण्याची व्यवस्था, जेवण आणि पार्टी अशा सर्व खर्चांसह तीन दिवसांत त्याने जवळपास पूर्ण पगार उडवला.
त्याने पुढे असेही म्हटले की, “खरं सांगायचं तर हा माझा दुसरा पगार होता. पहिला पगार मी माझ्या आई-वडिलांना गिफ्ट म्हणून दिला होता. दुसरा पगार मिळताच मी थेट मित्रांकडे गेलो आणि आयुष्यात कधी न केलेली पार्टी केली.”
पगार तर उडवला पण…
मात्र या खर्चानंतर त्याची परिस्थिती अशी झाली की, पगार मिळाल्यानंतर लगेचच त्याला महिन्याच्या खर्चासाठी वडिलांकडे पैसे मागावे लागले. यामुळे काही लोकांनी त्याच्या निर्णयावर टीका केली, तर काहींनी या क्षणाला ‘एकदाच येणारा खास अनुभव’ म्हणून पाठिंबा दिला. पोस्टमध्ये त्याने पार्टीचं बिलदेखील शेअर केलं असून, त्यानुसार त्याने केवळ खाण्या-पिण्यावरच १९ हजार ७१९ रूपये खर्च केले. ही रक्कम पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
दरम्यान, सोशल मीडियावर या पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने २००७ सालातील अनुभव सांगत लिहिले, “आमच्या सहा मित्रांच्या पार्टीचा खर्च तेव्हा २०० रूपयांच्या आत होता. २० वर्षांत किती बदल झाला आहे, हे पाहून आश्चर्य वाटते.”
दुसऱ्या एका युजरने विनोद करत म्हटले, “तू तर पब स्टाफलाही पार्टी दिलीस, सर्व्हिस चार्जवरच ७६८ रूपये खर्च झाले! पण जोक बाजूला ठेवला तर छान केलं, आता पुढे गुंतवणूक कर आणि नोकरीवर लक्ष दे.” काहींनी मात्र या खर्चाचे समर्थन करत “हीच तर खरी लाईफ आहे, अजून अशा पार्टीज होऊ देत” अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी “पहिल्या काही महिन्यांत मजा करा, YOLO (You Only Live Once)” असे म्हणत त्याचे समर्थन केले.
दरम्यान, संबंधित तरुणानेही आपल्या चुकांची जाणीव व्यक्त करत पुढील महिन्यापासून पैसे साठवण्याचा आणि आर्थिकदृष्ट्या अधिक जबाबदारीने वागण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “पुढच्या पगारापासून मी नक्कीच बचत सुरू करेन आणि पैशांचा योग्य वापर करेन,” असे तो म्हणाला.
या व्हायरल पोस्टमुळे तरुणांमध्ये वाढत चाललेल्या ‘तत्काळ आनंदासाठी खर्च’ या प्रवृत्तीवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
