Gen Z Job Interview by Senain Sawant : आपल्या देशात सध्या बेरोजगारी वाढली आहे. देशातील लाखो तरूण नोकरीच्या शोधात आहेत. हे तरूण सतत वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, संस्था व स्टार्टअप्समध्ये नोकरीसाठी अर्ज करतात, मुलाखती देतात. या मुलाखतींसाठी चागली तयारी देखील करतात, जेणेकरून त्यांना चांगली नोकरी व उत्तम पगार मिळावा. परंतु, याच बेरोजगार तरुणांच्या गर्दीत असेही काही तरुण-तरुणी आहेत ज्यांना नोकरीची संधी मिळते, ते मुलाखतींना सामोरे जातात, मात्र त्या मुलाखतींच्या वेळी अशा काही गोष्टी करतात, ज्या पाहून नोकरी देणारी व्यक्ती, कंपन्यांमधील मानव संसाधन (एचआर) विभागातील अधिकारी, मुलाखतकारच घाबरतो. प्रामुख्याने मुलाखत देण्यासाठी समोर बसलेला उमेदवार जेन झी (Gen Z/ Generation Z or Zoomer/ १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेले तरुण-तरुणी) पिढीतील असेल तर अधिक चिंता असते. दरम्यान, असंच एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. ज्यामध्ये उमेदवाराने मुलाखत घेणाऱ्या उद्योजिकेविरोधात अपशब्द वापरले. मुंबईतील उद्योजिका सेनैन सावंत यांना या विचित्र अनुभवाचा सामना करावा लागला आहे. सेनैन सावंत यांनी मुलाखतीच्या वेळी त्यांना आलेला अनुभव समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. सेनैन या मुंबईत त्यांची ग्रम्प ही स्टार्टअप कंपनी चालवतात. या कंपनीत नोकरीसाठी आलेल्या एका उमेदवाराची मुलाखत घेताना आलेला अनुभव त्यांनी शेअर केला आहे. त्यांनी लिंक्डइनवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की आमच्या कंपनीच्या सोशल मीडिया एक्जिक्युटिव्ह पोस्टसाठी गूगल मीटवर एक मुलाखत घेत होते. उमेदवाराच्या रेज्यूमेमधून (नोकरीसाठी केलेला अर्ज) पुरेशी माहिती मिळत नव्हती, त्यामुळे मी त्याला इंटर्नशिप करण्याची ऑफर दिली. त्या उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी व्हिडीओ ऑन केला नव्हता. त्याने सांगितलं की आयओएसचं एक अपडेट नसल्यामुळे व्हिडीओ ऑन करण्यात अडचण येत आहे. त्यावर मी त्याला म्हणाले, तू व्हिडीओ कॉलसाठी उपलब्ध असशील तेव्हा आपण ही मुलाखत घेऊ. यासह सावंत यांनी त्या उमेदवाराबरोबरचं व्हॉट्सअॅप चॅट शेअर केलं आहे. त्यामध्ये उमेदवार त्यांना म्हणाला, "मी अनुभवी आहे, त्यामुळे मी इंटर्नशिप करणार नाही. त्यानंतर त्याने सावंत यांचा 'B**ch' असा उल्लेख करत काही अपशब्द वापरले. हे ही वाचा >> अरे हे काय? साडी न दिल्याने पत्नीने थेट केली तक्रार; मजेशीर प्रकरणावर कसा निघाला तोडगा; कुठे घडली घटना? घ्या जाणून या पिढीचं काय होणार? सेनैन सावंत यांची पोस्ट पाहून अनेक युजर्सने यावर चिंता व्यक्त केली आहे. एका युजरने त्यावर कमेंट केली आहे की "नव्या पिढीतील तरुणांनी त्यांचं आचरण सुधारलं पाहिजे". दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की "अशा मुलांशी काही वेळ बोलल्यानंतर आपल्या मनात निराशा येते, आपण काही वेळ तणावात असतो". काही युजर्सने सूचना केली आहे की "आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना काही कौशल्याची कामं शिकवायला हवीत, आचरण कसं असलं पाहिजे ते शिकवलं पाहिजे. व्यक्तिमत्व विकासावर भर दिला पाहिजे.