Washing Potatoes with Slippers Viral Video: भारतात स्ट्रीट फूड किंवा रस्त्यावरील खाद्यपदार्थांची क्रेझ प्रचंड आहे. मात्र, अनेकदा या पदार्थांच्या स्वच्छतेबाबत (Hygiene) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. आता गाझियाबादमधून एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. येथील एका प्रसिद्ध आलू टिक्की विक्रेत्याचा बटाटे धुतानाचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
हा व्हिडिओ गाझियाबादच्या लोनी भागातील ‘कृष्णा चाट भंडार’ येथील असल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळी दुकानाच्या बाहेर एक व्यक्ती मोठ्या पातेल्यात उकडलेले बटाटे धुताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही व्यक्ती पायात रोजच्या वापरातील चपला घालून चक्क पायाने ते बटाटे रगडत आहे.
ग्राहकानेच बनवला व्हिडिओ
हा व्हिडिओ एका महिला ग्राहकाने शूट केल्याचे समजते. व्हिडिओमध्ये ती म्हणते, “माझी आई नेहमी याच ठिकाणाहून आलू टिक्की खायची. मला तिला दाखवायचे होते की हे लोक बटाटे पायाने धुतात. हे अतिशय लाजिरवाणे आणि घृणास्पद आहे.” हा विक्रेता दररोज सुमारे ५०० हून अधिक ग्राहकांना चाट आणि टिक्की विकतो, अशी माहिती समोर आली आहे.
पोलीस कारवाई आणि तपास
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी अशा प्रकारे अस्वच्छ पद्धतीने काम केले जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.
सोशल मीडियावर संताप
एका युजरने कमेंट करताना म्हटले, “हे लोक चक्क चपला घालून बटाट्यांवर नाचत आहेत आणि याला लोक ‘यूपीचा स्वाद’ म्हणतात? हे भयानक आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “व्हिडिओ कॅमेरा असल्यामुळेच या लोकांचे खरे चेहरे समोर येत आहेत.” मात्र, काही जणांनी विचित्र युक्तिवाद करत म्हटले की, बटाट्यांवरील माती काढण्यासाठी ही सोपी पद्धत आहे.
