Girl Breaks Down After Delhi Protest Lathi Charge: आंदोलन, घोषणाबाजी आणि पोलिसांचा बंदोबस्त… अशा तणावपूर्ण वातावरणात घडलेला एक भावनिक क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजीपी)च्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीमारानंतर एका विद्यार्थिनीला अश्रू अनावर झाल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, रडताना तिने महिला पोलिस कर्मचाऱ्यांना केलेले आवाहन अनेकांना भावूक करून गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी सकाळी कॉक्रोच जनता पार्टी (सीजीपी)च्या आंदोलनातील विद्यार्थी आणि आंदोलनकर्ते संसद भवनाच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले होते. आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दीपके करत होते. आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक तीव्र झाले होते. याचवेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात तणाव निर्माण झाला.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा दलांनी लाठीमार केल्याचे, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईनंतर काही आंदोलनकर्ते जखमी झाले; तर काही जण भावनिक झाल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येते.
याच घटनेतील एका विद्यार्थिनीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये ती विद्यार्थिनी गर्दीमध्ये उभी असून, तिच्या डोळ्यांत अश्रू दिसतात. ती रडत रडत महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसते.
व्हिडीओमध्ये ती भावनिक स्वरात म्हणते, “मॅडम, विचार करा… तुमची मुलं असती, तर तुम्ही त्यांच्याशी असंच वागला असता का? आम्हीही तुमच्या मुलांसारखेच आहोत.” तिचे हे शब्द ऐकून आजूबाजूचे काही लोक तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर पोलिस कर्मचारीही तिला समजावून गर्दीपासून बाजूला नेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
या भावनिक व्हिडीओतून आंदोलनकर्तेही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे. आंदोलन मागे घेण्यास ते तयार नसल्याचे आणि आपला आवाज पोहोचवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे या घटनेतून दिसून येते.
हा व्हिडीओ @sauravyadav1133 या एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून शेअर करण्यात आला असून, तो लाखो लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी विद्यार्थिनीच्या डोळ्यांतील वेदना आणि तिच्या शब्दांमधील हतबलता अधोरेखित केली आहे; तर काहींनी आंदोलने हाताळताना पोलिसांनी अधिक संयम बाळगण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. काही प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता व्यक्त करणाऱ्या होत्या.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असला तरी आंदोलनादरम्यान नेमक्या कोणत्या परिस्थितीत ही घटना घडली, याबाबत अधिकृत तपशील समोर आलेला नाही. मात्र, आंदोलन, पोलिसी कारवाई आणि एका विद्यार्थिनीचे अश्रू… या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे हा VIDEO सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
