Girl Dancing on Road as Bus Approaches: पावसाळा आला की, सोशल मीडियावर रील्सचा अक्षरशः पूर येतो. कोसळणाऱ्या पावसात डान्स, फोटोशूट आणि व्हिडीओ बनवण्याची अनेकांना भुरळ पडते. पण प्रसिद्धीच्या नादात कधी कधी एक छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरारक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना काही क्षणांसाठी तुमचाही श्वास रोखला जाईल.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी मुसळधार पावसात रस्त्याच्या अगदी मध्यभागी उभी राहून डान्स करीत रील शूट करताना दिसते. आजूबाजूला हिरवळ, पावसाच्या सरी आणि निवांत वातावरण असल्यामुळे ती अगदी मनमोकळेपणाने नाचत असते. तिचे संपूर्ण लक्ष कॅमेऱ्याकडे असते. मागून काय घडतेय, याची तिला अजिबात कल्पना नसते.
इतक्यात अचानक मागून एक भरधाव बस वेगाने तिच्या दिशेने येताना दिसते. बसचा वेग पाहून काही क्षणांसाठी मोठा अपघात होणार की काय, अशी भीती वाटू लागते. व्हिडीओ पाहणाऱ्यांच्याही हृदयाचा ठोका चुकतो. पुढच्या क्षणी काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहतं.
मात्र, शेवटच्या क्षणी बसचालक प्रसंगावधान राखतो आणि बस तरुणीच्या अगदी जवळ येऊन थांबते. त्यामुळे काही क्षणांसाठी निर्माण झालेला तणाव दूर होतो. विशेष म्हणजे एवढं सगळं घडल्यानंतरही ती तरुणी अजिबात घाबरत नाही. ती पुन्हा त्याच उत्साहात आपला डान्स सुरू ठेवते आणि रीलचं चित्रीकरण पूर्ण करते.
या व्हिडीओच्या पार्श्वभूमीला ‘पर्वत से काली घटा’ हे गाणं ऐकू येत असल्यानं संपूर्ण दृश्य आणखी लक्षवेधी वाटतं. मात्र, या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी अशा प्रकारे रस्त्याच्या मध्यभागी रील बनवणं किती धोकादायक ठरू शकतं, याकडे लक्ष वेधलं आहे.
हा व्हिडीओ एक्सवरील @rabiyask2021 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. त्यासोबत ‘रस्त्याच्या मध्यभागी कधीही रील बनवू नका. छोटासा निष्काळजीपणा मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरू शकतो,’ असा इशाराही देण्यात आला आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तरुणीच्या निष्काळजीपणावर टीका केली. “व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करतात,” अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. तर दुसऱ्याने, “रस्त्यावर अशा प्रकारे रील बनवणं अत्यंत धोकादायक आहे,” असं म्हटलं.
काहींनी मात्र हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिल्या. “बसचा चालक खाली उतरून तिला ओरडेल, असं वाटलं होतं,” अशी टिप्पणी एका युजरने केली. तर आणखी एकाने “बस इतक्या जवळ येऊनही थांबली कशी”, असा प्रश्न उपस्थित केला.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की, सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणं कधीही योग्य नाही. काही सेकंदांची रील पुन्हा बनवता येते; पण एक छोटी चूक आयुष्यभराची ठरू शकते. त्यामुळे कोणताही व्हिडीओ किंवा रील तयार करताना सुरक्षिततेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं.
