Girl Falls while Shooting Reel: शॉर्ट व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकण्यासाठी हल्लीची मुलं काहीही करायला तयार असतात. रील बनिवण्याच्या नादात अनेक तरुणांने हकनाक बळी गेले आहेत. मुंबईतील सीए तन्वी कामदार हीचा काही दिवसांपूर्वीच रायगड येथील कुंभे धबधब्याजवळ दरीत कोसळून मृत्यू झाला होता. सोशल मीडियावर काही लाईक्स आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनेकजण आपल्या जीवशी खेळण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रसंग उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात घडला आहे. येथील एका इमारतीमध्ये बालकनीत रील तयार करत असताना एक तरूणी सहाव्या मजल्यावरून थेट रस्त्यावर पडली. रस्त्यावर विव्हळत असतानाचा तिचा व्हिडीओ आता व्हायरलहोत आहे.

नेमका प्रकार काय घडला?

अपघातग्रस्त मुलीचे वय १६ असल्याचे सांगितले जाते. गाझियाबादच्या इंदिरापूर येथील क्लाउड ९ सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर सदर मुलगी आई-वडिलांसह राहते. घराच्या बालकनीत रील शूट करत असताना मुलीचा मोबाइल बालकनीतून खाली पडला. मोबाइल पकडण्यासाठी मुलीने धडपड केली, मात्र मोबाइल वाचविण्याच्या नादात तीही खाली पडली.

हे वाचा >> ‘तुम्ही मुली आहात का रे?’ फुटबॉल सामना हरल्यानंतर प्रशिक्षकाने खेळाडूंना लाथाबुक्यांनी तुडवलं; VIDEO व्हायरल

खाली पडल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत विव्हळत असताना अनेक लोक तिच्या आजूबाजूला गोळा झाले. जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिकांनी धडपड केली. मुलीची आईही याठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ती मुलीला ओरडू लागली. पण मुलगी त्याही अवस्थेत “आई, वडिलांना बोलव”, असे आर्जव करत होती. स्थानिकांनी तिथेच उभ्या असलेल्या एका वाहनात टाकून मुलीला रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी काढलेल्या या व्हिडीओमध्ये मुलीची आई तिला बोल लावताना दिसत आहे. रील बनविण्याच्या तिच्या छंदावर बोलत असताना आई म्हणते की, ही वाईट मुलगी आहे. आई-वडिलांचे नाव धुळीस मिळविण्याचे काम करत आहे. प्रत्यक्षदर्शींनी वेळीच या मुलीला रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचा जीव वाचला असून ती आता धोक्यातून बाहेर आहे. तसेच तिच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा >> ‘कर्म इथेच फेडावे लागतात…’ श्वानाला तलावात फेकणाऱ्या तरुणीबरोबर घडलं असं काही VIDEO पाहून बसेल धक्का

म्हणून जीव वाचला

या घटनेत कदाचित तिचा जीवही जाऊ शकला असता. सहाव्या मजल्यावरून कोसळूनही ती जिवंत राहिल्याबद्दल स्थानिकांनाही आश्चर्य वाटले. इंदिरापूरचे पोलीस उपायुक्त स्वातंत्र्य कुमार सिंह यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, बालकनीतून पडणारा मोबाइल वाचविताना सदर तरूणी खाली पडली. खाली एक मोठी कुंडी होती, या कुंडीतील मातीमुळे मुलीच्या डोक्याला फारशी गंभीर दुखापत झाली नाही.

सोशल मीडियावर थोड्याश्या कालावधीसाठी मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी सध्याची तरुणाई कोणत्याही थराला जाऊन व्हिडीओ चित्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मात्र तरीही अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे.