लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यान् पिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पसंतीस उतरते. लावणी ही वाटते तितकी सोपी नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच, त्याचबरोबर अदाकारीही करावी लागते. ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी नृत्याचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात; पण एखादाच व्हिडिओ असा असतो जो प्रेक्षकांचे मन जिंकतो. दरम्यान, सध्या “इश्काची मी सुरी” या गाण्यावर एका लहान मुलीने ठसकेबाज लावणी नृत्य करत सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

इश्काची मी सुरी लहान मुलीची जबरदस्त लावणी

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मुलीने “इश्काची मी सुरी, करते घायाळ रोज शिकारी” या गाण्यावर लावणी अत्यंत ऊर्जेने आणि अचूकपणे सादर केली आहे. तिचे हावभाव आणि नृत्याने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. तिच्या प्रत्येक स्टेपमध्ये दिसणारा आत्मविश्वास हा व्हिडिओचे मुख्य आकर्षण ठरला आहे. पारंपरिक नऊवारी साडी अन् पायात घुंगरू अशा अस्सल मराठमोळ्या वेशभूषेत या मुलीने लावणी नृत्य सादर केले आहे. harshita_kadam_08 नावाच्या इन्स्टाग्राम खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून तो तुफान व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांचे जिंकले मन

हा व्हिडिओ पोस्ट होताच काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये तर कौतुकाचा पूर आला आहे. नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते की, या मुलीने सादर केलेल्या अस्सल लावणीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. “आपल्या रायगडची शान” आणि “घायाळ झाली मुंबई” अशा शब्दांत तिचे कौतुक करत नेटकऱ्यांनी तिच्या नृत्याला मानाचा मुजरा दिला आहे.

इतक्या लहान वयात तिचे अचूक हावभाव, अदाकारी, उत्कृष्ट तोडा आणि प्रत्येक ठेक्यावर असणारी पकड पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. “आजच्या युगात अशी खरीखुरी लावणी खूप कमी पाहायला मिळते,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कुठेही स्टेप्स अर्धवट न सोडता तिने केलेल्या या ‘नादखुळा’ सादरीकरणावर प्रेक्षकांनी ‘कडक’, ‘जबरदस्त’ आणि ‘एक नंबर’ अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

लावणीची क्रेझ कायम

आजकालच्या पाश्चात्त्य संगीताच्या आणि आधुनिक डान्सच्या काळातही अस्सल मराठमोळ्या लावणीची क्रेझ किती मोठी आहे, हे या व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या मुलीच्या डान्सने केवळ सोशल मीडिया गाजवला नाही, तर महाराष्ट्राच्या मातीतील कला किती समृद्ध आहे याची प्रचिती दिली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ग्रुप्सवर जोरदार शेअर केला जात असून, ही मुलगी रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.