Rapido Driver Harassment Video : सध्या प्रवासासाठी अनेक खासगी कंपन्यांच्या कार सेवा उपलब्ध झाल्या आहेत. वेळेत बस, टॅक्सी, रिक्षा न मिळाल्यास लोक ओला, उबर, रॅपिडो यांसाख्या खासगी प्रवासी वाहतूक सेवांचा उपयोग करतात. मात्र, या खासगी सेवांचा वापर करीत असताना अनेकदा प्रवाशांना धक्कादायक अनुभवांचा सामना करावा लागतो. विशेषत: महिलांबरोबर अनेकदा आक्षेपार्ह घटना घडल्याचे आपण पाहिले असेल. अशीच एक आक्षेपार्ह घटना नुकतीच घडली आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये एका रॅपिडो राईडचालकाने एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
आरोपी चालकाने संबंधित विवाहित महिलेला मोबाईलवर आक्षेपार्ह मेसेज पाठवले. त्यानंतर महिलेच्या पतीने त्या ‘रॅपिडो’ चालकाला पकडले आणि चांगलाच धडा शिकवला. महिलेच्या पतीने याबाबत एक व्हिडीओ बनवून, तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर कंपनीने त्या चालकाला ‘रॅपिडो’च्या सेवेतून काढून टाकले आहे. व्हिडीओत संशयित आरोपी चालक माफी मागतानाही दिसत आहे.
नेमकी घटना काय?
गुरुग्राममधील एका महिलेने प्रवासासाठी ‘रॅपिडो’ बुक केली. जेव्हा चालक तिच्या घराखाली पोहोचला तेव्हा त्याने तिला मेसेज पाठवला की, मी तुमच्या घराखाली उभा आहे. मेसेजमध्ये पुढे त्याने असेही लिहिले होते की, तुमचा फ्लॅट नंबर द्या, घरात एकटी असशील तर मी येतो. इतकेच नाही, तर चालकाने महिलेला त्याचा पर्सनल मोबाईल नंबरदेखील मेसेज केला. या मेसेजमुळे घाबरलेल्या महिलेने लगेच पतीला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पतीने सोशल मीडियावर पोस्ट करीत चालकाला चांगलाच धडा शिकवला.
ही घटना गैरसमजातून झाल्याचा चालकाचा दावा
संबंधित पीडित महिलेच्या पतीने थेट त्या चालकाचा शोध घेत त्याची प्रत्यक्षात भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओत चालक माफी मागताना दिसतोय. तसेच माझ्या मेसेजचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि त्यामुळे ही घटना गैरसमजातून झाल्याचा दावा त्याने केला आहे.
पीडित महिलेच्या पतीने आरोप केला की, संशयित आरोपी चालक दुसऱ्याच्या ‘रॅपिडो’ आयडीवर चालक म्हणून काम करीत होता, ज्यामुळे कंपनीच्या चालक पडताळणी प्रक्रियेबद्दल आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आता मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे संबंधित महिलेच्या पतीने या घटनेची पोस्ट ‘रॅपिडो’ला टॅग करून कंपनीच्या भोंगळ कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर युजर्सदेखील या घटनेचा तीव्र निषेध करीत आहेत. तर, अनेक जण महिलेच्या पतीने केलेल्या कृत्याचे कौतुक करीत आहेत. एका युजरने लिहिले, “मला भीती वाटतेय… तुमच्या पत्नीला सध्या काय वाटत असेल याची मी फक्त कल्पना करू शकतो. तुम्ही परिस्थिती इतक्या चांगल्या प्रकारे हाताळली याचा मला आनंद आहे.”
दरम्यान, या घटनेवर ‘रॅपिडो’ने एक निवेदन जारी केले, ज्यात त्यांनी म्हटले की, चालक आणि ज्या आयडीवर तो कार चालवत होता, तो आयडी आम्ही सेवेतून काढून टाकला आहे. कंपनीने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे म्हटले आहे.