गोव्यामधील सर्वात जुन्या आणि नाईट लाईफसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्लब टिटोची विक्री करण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे. स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडून, राजकारण्यांकडून आणि सेवाभावी संस्थांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून क्लब विकत असल्याचं रिकार्डो डिसोझा यांनी स्पष्ट केलं आहे. क्लबची मालकी संयुक्तरित्या वाटून घेण्यात आली असून त्यामध्ये डिसोझा यांचाही समावेश आहे. मात्र हा क्लब नक्की कोणाला विकण्यात आलाय याची माहिती देण्यात आली आहे.

आम्हाला फार खेदाने आणि रागाने हे सांगावंसं वाटत आहे की गोव्यामधील आमचा संपूर्ण व्यापार आम्ही विकला आहे. मला स्वत:ला यामधून कमी तोटा झाला आहे कारण मला योग्य मबदला मिळाला आहे. माझी पुढील पिढ्यांनाही काम करण्याची गरज नाही इतका मोबदला मला मिळालाय,” असं डिसोझा यांनी सोशल नेटवर्किंगवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

डिसोझा यांनी या पोस्टमध्ये उपहासात्मकरित्या हा क्लब चालवताना त्यांना छळणाऱ्यांना सल्ला दिलाय. ज्यांनी आम्हाला छळलं त्यांना आता येथे त्यांच्या इच्छेनुसार लोकांना कामाला ठेवता येईल. तसंही या लोकांकडे बऱ्याच काळापासून (आम्हाला छळण्याव्यतिरिक्त इतर) काही काम नव्हतं, असा टोला डिसोझा यांनी लगावला आहे.  “आमच्या क्लबमधील अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनाही नोकऱ्या द्याव्यात. गोव्यात यापुढे मला कोणताही व्यवहार करायचा नाहीय. अधिकारी म्हणजे ज्यांनी आमचा छळ केला ते पोलीस, नियोजन विभाग, कोस्टल रेग्युलेशन झोन, सेवाभावी संस्था, सरपंच, विभागीय अधिकारी आणि उप जिल्हाधिकाऱ्यांबद्दल मी बोलतोय,” असं डिसोझा पोस्टमध्ये म्हणालेत.

“मला सरकारमधील काही जणांचे आभार मानायचे आहेत. उदाहणार्थ डॉक्टर (मुख्यमंत्री प्रमोद) सावंत, आयएएस अधिकारी, माजी कर्मचारी, सध्याचे कर्मचारी, आमचे शेजारी, माझे सर्व मित्र, कुटुंबीय आणि सर्व सामान्य गोवेकरांचेही आभार मला मानायचे आहेत ज्यांनी टिटो हा ब्रॅण्ड निर्माण करण्यासाठी योगदान दिलं. हा एका पर्वाचा अस्त आहे,” असं डिसोझा म्हणालेत.

कलंगुट येथे असणारं टिटो क्लब हे मागील चार दशकांपासून गोव्यातील नाईट लाईफची ओळख होतं. क्लबच्या अधिकृत वेबसाईटनुसार १९७१ साली या क्लबची स्थापना झाल्यानंतर येथे एकूण ८७ हजार ६०० तास गाणी वाजवण्यात आलीय. या ठिकाणी एकूण १६ हजार ४२५ पार्टी झाल्यात आणि दर महिन्याला या ठिकाणी ९० हजारहून अधिक पर्यटक भेट द्यायचे. मात्र आता हे क्लब विकण्यात आलं असून पुन्हा येथे क्लब सुरु केलं जाणार की अन्य काही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.