शहरांमधल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सुविधा, स्वच्छता आणि उपचारांबाबत बर्यापैकी सोय असते; पण ग्रामीण भागातली सरकारी रुग्णालयं अजूनही अनेक मूलभूत समस्यांशी झगडताना दिसतात. कधी डॉक्टर कमी असतात, कधी औषधांची कमतरता असते, तर कधी स्वच्छतेच्या समस्या असतात. अशातच एका धक्कादायक व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यातून समोर आला आहे.
गोंडा मेडिकल कॉलेजमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तो पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. कारण- येथे रुग्णांपेक्षा उंदरांची जास्त वर्दळ दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ गोंडा मेडिकल कॉलेजच्या एका रुग्णांच्या वॉर्डमधला आहे. या व्हिडीओमध्ये रुग्ण उपचार घेत असलेल्या खाटेजवळच उंदीर फिरताना स्पष्टपणे दिसत आहे.
हॉस्पिटलमध्ये असणारी स्वच्छता, सुरक्षा व रुग्णांची काळजी यावर या व्हिडीओमुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा व्हिडीओ एका रुग्णाच्या नातेवाइकानं शूट केल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये एक रुग्ण खाटेवर झोपलेला आहे. त्याच्या अगदी बाजूला असलेल्या स्टीलच्या रॅकवर औषधं व जेवण ठेवलेलं आहे. त्याच ठिकाणी उंदीर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
रुग्णासाठी ठेवलेलं जेवण डिस्पोजेबल डब्यात असलं तरी उंदरांच्या भीतीमुळे कोणीही ते खाण्याची हिंमत करीत नाही. वॉर्डमध्ये एवढे उंदीर आहेत की, जणू तेच या रुग्णांना बघायला आले आहेत की काय, असं वाटत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे
हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच लोकांनी सरकार आणि प्रशासनावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षानंही हा व्हिडीओ ट्विटर अकाउंटवर शेअर करीत यूपी सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
एका युजरनं लिहिलं, “हासुद्धा विकासाचाच भाग असावा. आता उंदरांनाही मोफत उपचार मिळत आहेत.” तर दुसऱ्यानं म्हटलं, “रुग्णांना औषधं मिळोत न मिळोत; पण हॉस्पिटलमध्ये उंदीर हमखास मिळतात.” या प्रतिक्रियांमुळे प्रकरण आणखी चिघळलं असून, प्रशासनाला चौकशीचे आदेश द्यावे लागले आहेत.
