जगातलं सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन कुठलं असा प्रश्न विचारला तर त्याचं बिनधोकपणे उत्तर असेल गुगल! पण आपल्या युजर्सची किंवा त्यांच्याकडून विचारल्या जाणाऱ्या माहितीची पुरेपूर काळजी घेणारं गुगल त्यांच्या कर्मचाऱ्यांचीही तितकीच काळजी घेतंय, हे नुकत्याच कंपनीकडून करण्यात आलेल्या एका मोठ्या घोषणेवरून स्पष्ट झालं आहे. गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केली असून त्यामुळे गुगलच्या कर्मचाऱ्यांचा उत्साह चांगलाच वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वृत्तानुसार गुगलनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १६०० डॉलर्स अर्थात भारतीय चलनात जवळपास १ लाख २० हजार रुपये रोख वन टाईम बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे! विश्वास बसत नसला, तरी हे वृत्त खरं आहे. जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १६०० डॉलर्स इतका एकरकमी बोनस देण्याची घोषणा गुगलनं बुधवारी केली आहे. त्यामुळे, एकीकडे गुगलनं नुकतीच वर्क फ्रॉम होम बंद करून ऑफिसमधून काम करण्याची योजना पुढे ढकलली असताना दुसरीकडे या घोषणेमुळे गुगलच्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला आहे!

बोनस मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये गुगलच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांसोबतच एक्स्टेंडेड वर्कफोर्स आणि इंटर्न्स यांचा देखील समावेश आहे. त्या त्या कर्मचाऱ्याच्या देशातील चलनानुसार १६०० डॉलर्सची जेवढी किंमत होईल, तेवढी रक्कम कर्मचाऱ्याला बोनस म्हणून दिली जाणार आहे.

कधी मिळणार रक्कम?

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ही रक्कम कर्मचाऱ्यांना चालू महिन्यातच म्हणजे डिसेंबर २०२१ मध्येच मिळणार असल्याचं अल्फाबेटकडून जाहीर करण्यात आलं आहे. गुगलकडून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा भत्ता दिला जातो. याशिवाय, नुकताच कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी ५०० डॉलर्स वेलबिइंग बोनस देखील देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंपनीनं कर्मचाऱ्यांना एकरकमी बोनस देण्याची घोषणा केली आहे.

Google Year in Search 2021: यावर्षी भारतीयांनी इंटरनेटवर सगळ्यात जास्त काय सर्च केलं? जाणून घ्या

या वर्षाच्या मार्च महिन्यात गुगलमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. त्याच्या निष्कर्षांनुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेलबिइंगमध्ये अर्थात त्यांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये गेल्या वर्षभरात घट झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर कंपनीने ५०० डॉलर्सचा वेलबिइंग बोनस जाहीर केला होता.

वर्क फ्रॉम होम कधी बंद होणार?

दरम्यान, वर्क फ्रॉम होम बंद करून कंपनीतून कामाला सुरुवात करण्याबाबत गुगलनं आपला आधीचा निर्णय स्थगित केला आहे. १० जानेवारीपासून गुगलनं कर्मचाऱ्यांना कंपनीत येऊन काम करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नव्याने सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका आणि कर्मचाऱ्यांचा विरोध या पार्श्वभूमीवर गुगलनं हा निर्णय स्थगित केला आहे.

More Stories onगुगलGoogle
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google alphabet announced 1 lakh 20 thousand bonus for employees pmw
First published on: 09-12-2021 at 13:54 IST